मुंबई- ठाण्याला जोडणाऱ्या कोपरी रेल्वे पूलावर तुळई बसविल्यानंतर आतापर्यंत या प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्पष्ट केले आहे. कोपरी रेल्वे पूल प्रकल्प पूर्ण झाल्यास ठाणे, भिवंडी, नाशिकहून मुंबई, एेरोलीत जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूल हा मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा आहे. दररोज ठाणे, भिवंडी, नाशिक, घोडबंदर येथून हजारो वाहने या मार्गावरून मुंबई तसेच एेरोलीच्या दिशेने वाहतूक करत असतात. परंतु हा पूल वाहतूकीसाठी अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे दररोज या मार्गावर सकाळी आणि रात्रीच्यावेळी वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना सहन करावा लागतो. तसेच हा पूल जीर्ण झाल्याने २०१६ मध्ये पूलाच्या रुंदीकरण आणि निर्माणासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन अतिरिक्त मार्गिका तयार करून दुसऱ्या टप्प्यात मुख्य पूलाची दुरूस्त केली जाणार होती. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासानाने २०१८ मध्ये पहिल्या टप्प्याच्या कामास सुरूवात केली.

हेही वाचा >>>आनंदनगर सबवेचे गर्डर बसविण्याचे काम पूर्ण; ठाण्यातील वाहतूक सुरळीत

पहिल्या टप्प्याचे काम सुमारे दीड वर्षापूर्वी पूर्ण झाले होते. त्यानंतर मुख्य पूलाचे म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले होते. या दुसऱ्या टप्प्याचे काम आता प्रगतीपथावर असून शनिवारी रात्री ११ ते रविवारी ६ वाजतापर्यंत या पूलावर तुळई उभारण्याचे काम करण्यात आले. २०० टन वजन उचलू शकतील अशा दोन क्रेन आणि ५० कामगार तुळई प्रत्यक्ष या कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. रविवारी सकाळी तुळई बसविण्याचे काम पूर्ण झाल्याने आता दोन्ही दिशेला कॅंाक्रीटीकरण आणि रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील तुळई बसविण्याचे काम शिल्लक राहणार आहे. असे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले. याप्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत २१० कोटी रूपये खर्च-
याप्रकल्पाच्या निर्माणासाठी २५६ कोटी रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. यापैकी २१० कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालेले आहेत.

Story img Loader