ठाणे : एमएमआरमधील मुंबई, नवी मुंबई या शहरांपर्यंत जाण्यासाठी सध्या डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील प्रवाशांना मोठा वळसा घालून जावा लागतो. हा वेळखाऊ प्रवास लवकरच थांबणार असून बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित असलेल्या एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली गेल्यास शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊन शहरांतर्गत वाहतूक कोंडीमुक्त होण्यास मदत होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी २०२३ वर्षात याची मागणी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणेपल्याड वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई – नवी मुंबई ते थेट कल्याण बदलापूर ॲक्सेस कंट्रोल महामार्ग आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्वप्रथम मागणी केली होती. एमएमआरडीएच्या वतीने या मार्गावर काम सुरू होते. महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनीही या मार्गासाठी पुढाकार घेतला होता. बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली या शहरांना थेट मुंबई तसेच नवी मुंबई या शहरांशी कशा पद्धतीने जोडता येईल याची चाचपणी सुरू होती. अखेर एमएमआरडीएच्या वतीने या एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या उभारणीसाठी प्रकल्प सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अंतर्गत एमएमआरडीएने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. हा मार्ग झाल्यास बदलापूर ते नवी मुंबई आणि मुंबई हा प्रवास गतीमान होईल.

सध्या बदलापूरहून अंबरनाथ आणि डोंबिवलीमार्गे काटई राज्यमार्गाने शिळफाटा, महापे मार्गे नवी मुंबई गाठावी लागते. तर खोणी तळोजा मार्गेही नवी मुंबईला जाता येते. मुंबईला जाण्यासाठी अडीच ते तीन तासांचा तर नवी मुंबईला जाण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ जातो. या वेळेसोबतच शहरांतर्गत प्रवास करावा लागतो. त्याचा शहरांतर्गत वाहतुकीवरही परिणाम होतो. गेल्या काही वर्षात या मार्गावर प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता.

also read

एसटीची भाडेवाढ दरवर्षी होणे गरजेचे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

असा असेल मार्ग

बदलापूर येथून जात असलेल्या मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या येथून या रस्त्याची सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. यामार्गावरून पुढे जात पालेगाव, कल्याण पूर्वेतून जात असून मार्गावर हेदुटणे मार्गाला जोडण्याची शक्यता आहे. येथे मेट्रो – १२ ची उभारणी सुरू आहे. तसेच येथून कल्याण रिंग रोडची प्रकल्पही जोडला जातो. कल्याण – शिळफाटा मार्गावर देखील येथून जवळच आहे. पुढे शिरढोण येथे महत्वाकांक्षी मल्टी मोड कॉरिडोअर महामार्गाला जाता येणे शक्य होईल.

also read
महापालिकेच्या घंटागाडीने वृद्धाला फरफटत नेले, अपघातात वृद्धाचा मृत्यू

प्रकल्पाचे फायदे

बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, २७ गावे, डोंबिवली, कल्याणचा ग्रामीण भाग या भागाला नवी कनेक्टीव्हिटी या मार्गामुळे मिळणार आहे. बदलापूर येथून मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याने नागरिकांना समृद्धी महामार्गाला जाता येणार आहे. शहरांतर्गत वाहतूक टाळून प्रवास करणे हा या महामार्गाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे कल्याणचा दुर्लक्षित भाग केंद्रस्थानी येणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda invited tenders for direct access route from badlapur to mumbai reducing congestion sud 02