ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली ते भिवंडीतील खारबाव असा खाडीपुलाबरोबच जोडरस्ता तयार करण्याच्या प्रकल्पाची आखणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतली आहे. मल्टी मोडल कॉरिडॉर, ठाण्याची खाडी आणि बुलेट ट्रेन या मार्गांवरून हा पुल रस्ता तयार केला जाणार असून त्यास राज्याच्या किनार क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखविला आहे. या प्रकल्पासाठी ठेकेदार निश्चित करण्यात आल्याने प्रकल्प उभारणीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या मार्गामुळे ठाणे आणि भिवंडी शहरातील कोंडीची समस्या कमी होण्याबरोबरच या दोन्ही शहरांमधील अंतरही कमी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील रस्ते प्रकल्पांना गती; वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत पार पडली महत्वाची बैठक

उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज गुजरात, नाशिक, भिवंडीच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. हि वाहने ठाणे, घोडबंदर, भिवंडी आणि मुंब्रा परिसरातून वाहतूक करतात. या वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच, भिवंडी शहर हे गोदाम आणि वस्त्रोद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील गोदामातून दररोज हजारो वाहने शहराच्या इतर भागांमध्ये वाहतूक करतात. याशिवाय, शहरातील नागरिकांची वाहनेही याच मार्गावरून वाहतूक करतात. वाहनांचा भार वाढल्याने कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेबरोबरच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नवनवीन रस्ते प्रकल्पांची आखणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे आणि भिवंडी शहराला जोडण्यासाठी गायमुख ते पायेगाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर अशा तीन ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा >>> ‘एमआयडीसी’चा भूखंड कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी;उद्याोगमंत्र्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

या प्रकल्पांचा विस्तृत आराखडा तयार करत प्राधिकरणाने कामाची निविदा काढली होती. त्याचबरोबर कामासाठी आवश्यक असलेल्या परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रकल्पांच्या कामासाठी काढलेल्या निविदांना मान्यता देऊन ठेकेदार निश्चित करण्यात आले. असे असतानाच, त्यापाठोपाठ आता राज्याच्या किनार क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची नुकतीच बैठक पार पडली असून त्यात सर्व बाबींचा विचार करून या प्रकल्पाच्या उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. यामुळे हा प्रकल्प उभारणीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधूनही या बाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

असा आहे प्रकल्प

कासारवडवली ते खारबाव हा पुल आणि रस्ता एकूण ३.९३ किमी लांबीचा असणार आहे. ४० मीटर रुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस प्रत्येकी ३ मार्गिका असणार आहेत. मल्टी मोडल कॉरिडॉर, ठाण्याची खाडी आणि बुलेट ट्रेन या मार्गांवरून हा पुल रस्ता तयार केला जाणार आहे. मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्राक्चर लिमिटेड या कंपनीला कामाचा कंत्राट देण्यात आलेले असून या प्रकल्पाचा एकूण खर्च १५२५ कोटी ३१ लाख रुपये इतका आहे.

प्रकल्पाचे फायदे

ठाणे ते भिवंडी या दोन शहरात जुना आग्रा रस्ता, माजिवडा, आणि मुंबई-नाशिक महामार्गे कळवा मार्गे वाहतूक सुरू असते. या शहरांमधून वाहतूक कोंडी होते. त्यावर मात करण्यासाठी कासारवडवली ते खारबाव हा पुल रस्ता तयार करण्यात येत आहे. भिवंडी  येथील खारबाव ते घोडबंदर येथील कासारवडवली हा प्रस्तावित पुल रस्ता चिंचोटी – अंजूर फाटा रोड, बाळकुम-गायमुख खाडी किनारी मार्ग आणि विरार अलिबाग मल्टी मॉडेल काॅरिडाॅरला थेट जोडला जाणार आहे. यामुळे ठाणे, घोडबंदर, भिवंडी तसेच आसपासच्या शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच दोन्ही शहरातील अंतर कमी होणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi zws