ठाणे जिल्ह्याच्या नागरीकरण होत असलेल्या ग्रामीण भागात नवे द्रुतगती महामार्ग तयार करून मुंबईवरील वाहतुकीचा ताण कमी करणे आणि ग्रामीण पट्टय़ातील वाहने मुंबईत जाताना रस्ते वाहतुकीत खोळंबा आणणार नाहीत, अशा पद्धतीने नव्या रस्त्यांच्या उभारणीचा प्रस्ताव ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने’ (एमएमआरडीए) तयार केला आहे. भिवंडी शहर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोगाव फाटा ते टेमघर गावापर्यंत भिवंडी बाह्यवळण (बायपास) रस्त्या बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
‘एमएमआरडीए’च्या भविष्यवेध कार्यक्रमात या रस्त्याचा समावेश आहे. या कामासाठी २०१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पोगाव फाटा ते टेमघर रस्त्यामुळे वाडा, गुजरात, पालघर, अहमदाबाद महामार्गाने भिवंडीच्या दिशेने येणारी वाहने शहरात न जाता बाह्यवळण रस्त्याने मुंबई-नाशिक महामार्ग, भिवंडी, कल्याण वळण रस्त्याच्या दिशेने येतील. तेथून ती मुंबई किंवा नाशिक या दिशेने जातील. अशी रस्त्यांची आखणी करण्यात आली आहे. भिवंडीत यंत्रमाग व्यवसाय आहे.
भिवंडी शहर नियोजनाअभावी बकाल होत चालले आहे. जागेची मोठी समस्या शहरात निर्माण झाली आहे. रस्ते, पदपथ अरुंद आहेत. त्यात बाजारपेठेचे ठिकाण असल्याने या शहरात वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. कोंडी सोडविण्यासाठी प्राधिकरणाने टेमघर ते पोगाव फाटा दरम्यान भिवंडी शहराबाहेरून जाणारा वळण रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
या रस्त्यामुळे शहराबाहेरील खेडी विकसित होण्यास मदत होईल. या भागात नवीन व्यवसाय सुरू होतील. आतापर्यंत भिवंडी शहराच्या गजबजाटामुळे उद्योग व्यवसायाच्या बाबतीत वाढ झाली नाही. ही वाढ होण्यास या नवीन रस्त्यांमुळे मदत होईल, असे सांगण्यात येते. येत्या १५ ते २० वर्षांत निधीच्या उपलब्धतेनुसार भविष्यवेध उपक्रमात हे रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे.
कायमस्वरूपी अधिकारी नाही
‘एमएमआरडीए’च्या क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी अनेक घोषणा शासनाकडून केल्या जात आहेत. परंतु या विकास कामांची अंमलबजावणी करण्यासाठी ‘एमएमआरडीए’कडे कायमस्वरूपी अधिकारी नसल्याचे समजते.
शासन, महापालिका व अन्य सरकारी आस्थापनांमधून विविध अभियंते, अधिकारी प्राधिकरणामध्ये प्रतिनियुक्तीवर येतात. अनुभव घेतात आणि निघून जातात अशी परिस्थिती प्राधिकरणात असल्याचे समजते. काही अभियंत्यांकडे विशेष प्रकल्पाची जबाबदारी सोपवली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा