कल्याण- कल्याण ते भिवंडी दरम्यान दळणवळण आणि वाहतुकीचे केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या कल्याण ते पडघा दरम्यानच्या पूल, रस्ते विकास कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ४०० कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. या कामांचा सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने सल्लागार नियुक्त केले आहेत. या अहवालानंतर निविदा आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कल्याण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना ‘एमएमआरडीए’कडून हाती घेण्यात आल्या आहेत. विशेष निधीतून ही कामे हाती घेण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेच्या डॉक्टर दाम्पत्याची ५६ लाखांची फसवणूक
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी, उंबर्डे, गांधारी पूल ते भिवंडी पडघा दरम्यान लहान, मोठ्या कंपन्यांची गोदामे उभी राहिली आहेत. दळणवळण आणि वाहतूक पुरवठ्याचे पडघा हे मोठे केंद्र झाले आहे. या केंद्रामुळे या भागातील वाहतूक वाढली आहे. यापूर्वीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे या भागातील रस्ते वाढत्या वाहतुकीला अपुरे पडत आहेत. नाशिक, गुजरात भागातून येणारे बहुतांशी माल वाहतूकदार पडघा येथून कल्याण मधील गांधारे पुलावरुन शिळफाटामार्गे उरण, पनवेल, कोकणात जात आहेत. पडघा ते कल्याण रस्त्यावरील वाहतूक गेल्या काही वर्षापासून वाढली आहे. या रस्त्यावर कल्याण जवळ गांधारी दोन पदरी पूल आहे. गांधारे पूल वाढत्या वाहतुकीला अपुरा पडत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची नियमित देखभाल केली जात नसल्याने या वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे पडतात. डोंबिवली, कल्याणहून पडघा, शहापूर भागात जाण्यासाठी बहुतांशी वाहन चालक मधला मार्ग म्हणून गांधारी पूल रस्त्याचा उपयोग करतात. गांधारी पूल ते पडघा पर्यंत १५ हून अधिक गाव, पाडे आहेत. भाजीपाला उत्पादन हे येथील गावकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. हा भाजीपाला कल्याण मधील बाजारात आणून विकला जातो. रिक्षा, बस, खासगी वाहने ही येथील लोकांची प्रवासाची मुख्य साधने आहेत. पावसाळ्यात या रस्त्याची सर्वाधिक दुर्दशा होते. या भागातील अनेक मुले शिक्षणासाठी कल्याणमध्ये येतात. त्यांचे खराब रस्त्यामुळे हाल होतात. हा सर्वांगीण विचार करुन प्राधिकरणाने कल्याण ते पडघा दरम्यानच्या गाव भागातील मुख्य रस्ते काँक्रीटीकरण, रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
विस्तारीकरण
गांधारी खाडी पुल दोन पदरी आहे. या पुलाचे चार पदरी विस्तारिकरण केले जाणार आहे. ५०० मीटर लांबीचा हा विस्तार होणार आहे. गांधारी पूल ते पडघा राष्ट्रीय महामार्गापर्यंत सापे गावापर्यंत दोन पदरी १० किमी अंतराचा डांबरी रस्ता आहे. हा रस्ता चारपदरी आणि काँक्रिटीकरणाचा केला जाणार आहे. बापगाव जंक्शन ते सोनाळे गावापर्यंत पाच किमी पर्यंतचा डांबरी रस्ता खराब झाला आहे. या रस्त्याचे दोन पदरीकरण आणि हा रस्ता काँक्रीटीकरणाचा केला जाणार आहे, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
“ कल्याण ते भिवंडी दरम्यानचा भाग वस्तू वाहतूक सेवा केंद्र, औद्योगिकरणासारखा विकसित होत आहे. कल्याण ते पडघा दरम्यानची रस्ते वाहतूक विशेष करुन माल वाहतूक सर्वाधिक वाढली आहे. यासाठी पुल, रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक होते. मुंबई-बडोदा रस्त्यामुळे हा परिसरत हब म्हणून विकसित होणार आहे.
प्रा. कविता भागवत– कल्याण
फोटो ओळ