कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या महत्वाकांक्षी बाह्य वळण रस्ते प्रकल्पातील डोंबिवलीतील मोठागाव ते कल्याणमधील गोविंदवाडी रस्त्या दरम्यानची एक हजार ११० झाडे तोडण्याची परवानगी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाकडे मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही झाडे तोडण्यापूर्वी या झाडांसंदर्भात कोणाच्या हरकती असल्यास त्यांनी पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाने केले आहे. मोठागाव ते गोविंदवाडी हा सात किलोमीटर लांबीचा बाह्य वळण रस्त्याचा भाग आहे. हा भाग उल्हास खाडी किनारी येतो. या भागात खार चिंच, विलायती चिंच, सुबाभुळ, खारफुटी, बोर, काटेसावर, वड झाडे अधिक प्रमाणात आहेत.

टिटवाळा-गांधारी पूल-वाडेघर, आधारवाडी, दुर्गाडी, गोविंदवाडी रस्ता ते खंबाळपाडा खाडी किनारा, डोंबिवलीत गणेशनगर, राजूनगर, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा ते मोठागाव ते कोपर, भोपर ते काटई ते हेदुटणे असा ३१ किलोमीटर लांबीचा बाह्य वळण रस्ता आहे. टिटवाळा ते दुर्गाडी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. अलीकडे मोठागाव ते गोविंदवाडी या सात किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्राधिकरणाने हाती घेतले आहे. ४५ मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. या रस्ते मार्गात एकूण एक हजार ११० झाडे आहेत. ही बाधित झाडे तोडल्याशिवाय रस्ते काम करणे शक्य नसल्याने एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंत्यांनी पालिकेच्या उद्यान विभागाकडे ही झाडे तोडण्यासाठी परवानगी मागितली आहे. बाधित झाडांच्या खोडावर या नोटिसा लावण्यात आल्या आहेत.

सतरा हजार झाडांचे रोपण

बाधित १ हजार ११० झाडांच्या बदल्यात या झाडांच्या आयुर्मानाप्रमाणे एकूण १७ हजार झाडांचे रोपण पालिका हद्दीतील सरकारी, महसूल विभागाच्या जमिनीवर केले जाणार आहे. या झाडांंची पूर्ण वाढ होईपर्यंत आणि त्यानंतरचे जतन पालिकेकडून केले जाणार आहे. बाधित झाडांमधील ६८२ झाडांचे पुनर्रोपण, ४२८ झाडे तोडली जाणार आहेत, असे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.

गेल्या वर्षी माणकोली पुलाच्या पोहच रस्ते मार्गावरील मोठागाव ते कोपर पोहच रस्त्यावरील १२८ झाडे बाधित होत असल्याने ही झाडे तोडण्याची परवानगी प्राधिकरणाने पालिकेकडे मागितली होती. या प्रस्तावाला पालिकेने मंजुरी दिली आहे. एखादे झाड ४० वर्षाचे असेल तर ४० झाडे त्या बदल्यात लावली जातील. एखादे झाड १५ वर्षाचे असेल तर १५ झाडे लावली जातील, असे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले.

वळण रस्त्यावरील बाधित झाडांचे जेवढे आयुर्मान आहे. त्या आयुर्मानच्या संख्येत तुटणाऱ्या प्रत्येक झाडाच्या नावे झाडे लावली जाणार आहेत. १११० बाधित झाडांच्या बदल्यात १७ हजार झाडांची लागवड केली जाईल. त्यांचे संवर्धन, जतन केले जाणार आहे. संजय जाधव उपायुक्त, उद्यान विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda seek permission from kdmc to cut 1110 trees for kalyan bypass road project zws