ठाणे : भिवंडी येथील काल्हेर भागातील माजी सरपंच स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर मंगळवारी त्यांच्या तीन गोदामांवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) पथक कारवाईसाठी गेले होते. पाटील यांनी जाब विचारल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार शांताराम मोरे निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या गोदामांवर कारवाई केली जात आहे का अशी चर्चा भिवंडीत रंगू लागली आहे. मंगळवारी त्यांना पक्षातून देखील काढण्यात आले आहे.
हेही वाचा >>> पाणी नाही तर मत नाही; अंबरनाथमध्ये पाण्यापासून वंचित मतदार बहिष्कारच्या भूमिकेत
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु मोरे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच काल्हेर गाव परिसरातील भाजपच्या माजी सरपंच स्नेहा पाटील यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शांताराम मोरे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्नेहा पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.
हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट एक-ए वरील सरकता जिना, उतार वाट रेल्वे पुलाच्या कामासाठी बंद
या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारी कृती असल्याचे सांगत त्यांना पक्षातून काढून टाकले आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री त्यांच्या काल्हेर येथील तीन गोदामांवर ‘एमएमआरडीए’चे पथक कारवाई करण्यासाठी धडकले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्नेहा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली. आमचे गोदाम ग्रामपंचायतीच्या परवानगीने १९९० पूर्वी बांधण्यात आले होते. तसेच कारवाई पूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती असा दावा स्नेहा पाटील यांनी केला आहे.
एमएमआरडीएला कारवाईची घाई ?
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) सुरेश म्हात्रे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत एमएमआरडीएचे पथक त्यांच्या गोदामांवर कारवाईसाठी गेले होते. त्यानंतर स्नेहा पाटील यांच्यावरही अशाच प्रकारे कारवाईसाठी पथक आल्याने कारवाया राजकीय हेतूने होत आहेत का अशी चर्चा भिवंडीत रंगू लागली आहे.