ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कासारवडवली भागात उड्डाणपुल उभारण्याचे कार्य सुरू झाले आहे. या कामासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी कासारवडवली गावात वाहतुक करणाऱ्या वाहनांसाठी मुख्य मार्गावरील विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवर वाहतुक नियोजन केले आहे. उड्डाणपूलाच्या कामासाठी किमान तीन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घोडबंदर मार्गावरून दिवसाला हजारो अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक होते. मागील काही वर्षांमध्ये घोडबंदर भागात नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे वाहनांचा भार देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ठाणे शहरातील कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीए मेट्रो मार्गिका चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) या प्रकल्पाच्या निर्माण सुरू आहे. वाहनांचा भार वाढल्याने यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तीन उड्डाणपुल आहेत. या उड्डाणपुलांव्यतिरिक्त आणखी एका उड्डाणपूलाची निर्मिती कासारवडवली भागात एमएमआरडीएकडून केली जात आहे. उड्डाणपूलाच्या कामासाठी आता ठाणे वाहतुक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर मोठे वाहतुक बदल लागू केले आहेत. उड्डाणपुल निर्माणाचे काम कासारवडवली भागात होणार असल्याने येथील सिग्नल ते कासारवडवली बस थांबा परिसरात बदल लागू केले आहेत. ठाण्याहून कासारवडवली गावात वाहतुक करणाऱ्या हलक्या वाहनांसाठी घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर विरुद्ध दिशेने अतिरिक्त मार्गिका तयार केली आहे. त्यामुळे घोडबंदर- ठाणे मार्गिकेवर त्याचा परिणाम होऊन कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम; अंगदुखी,सर्दी -खोकला, ताप, घसा दुखीमुळे नागरिक त्रस्त

कासारवडवली भागात उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुक कोंडी टाळण्यासाठी बदल लागू केले आहेत. हे वाहतुक बदल प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आले असून नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.

Story img Loader