२५ फेब्रुवारीपर्यंत कामे संपवण्याच्या सूचना
ठाणे : ठाणे शहराच्या अंतर्गत भागात बांधण्यात येत असलेले उड्डाणपूल निवडणुकीपूर्वी खुले करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. नौपाडय़ातील उड्डाणपूल आठ दिवसांत तर मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूल २५ फेब्रुवारीपर्यंत बांधून पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील बहुतेक रस्ते अरुंद असून अनेक रस्त्यांच्या रुंदीकरणास वाव राहिलेला नाही. वाढत्या वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊ लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. अल्मेडा चौकातील उड्डाणपुलाचे काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नौपाडय़ातील संत नामदेव चौकातील आणि मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या दोन्ही पुलांच्या कामासाठी यापूर्वी तीन ते चार वेळा मुदत जाहीर करण्यात आली होती. सुनील चव्हाण यांनी अतिरिक्त आयुक्तपदाच्या कार्यकाळात पुलांच्या कामाची पाहणी करून मुदत जाहीर केली होती. मात्र, मुदतीत काम पूर्ण झाले नाही. नवे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी मंगळवारी पुलाच्या कामाची पाहणी करून आठ दिवसांत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नौपाडय़ातील संत नामदेव चौकातील उड्डाणपुलाची मार्गिका रस्त्यावर उतरविण्याचे काम शिल्लक होते. गेल्या काही दिवसांपासून हे काम वेगाने सुरू असल्यामुळे पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. या कामाची पाहणी करून अतिरिक्त आयुक्त अहिवर यांनी पुलाच्या रंगरंगोटीसह उर्वरित कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच मीनाताई ठाकरे चौकातील एलबीएस पुलावरील डांबरीकरणाचे काम सुरू असून ते २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर २५ फेब्रुवारीनंतर राबोडी के-व्हिलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले जाणार असून ही मार्गिकाही लवकरच खुली केली जाणार आहे.
अल्मेडा चौकातील उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद
काही महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला अल्मेडा चौकातील उड्डाणपूल मंगळवारी रात्री ११ ते बुधवारी दुपारी ४ दरम्यान बंद ठेवण्यात आला होता. अवघ्या काही महिन्यांत नवा पूल दुरुस्तीसाठी बंद केल्याने कामाच्या दर्जाबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘पूलदुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला नाही. पुलावरील सांधेजोडणीच्या ठिकाणी पावसाळ्यात खड्डे पडू नयेत म्हणून ठेकेदाराकडून मॉस्टिकचे काम करण्यात आले. या कामासाठी हा पूल बंद ठेवला होता,’ असे त्यांनी स्पष्ट केले.