जयेश सामंत
ठाणे : मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या १४ हजार कोटी रुपयांच्या सात मोठय़ा विकास प्रकल्पांचे पुनर्विलोकन करण्याचा घाट एमएमआरडीएने घातला आहे. यातील अनेक प्रकल्पांची कंत्राटेही वाटण्यात आली आहेत. त्यानंतर आता पुन्हा ‘कामांचे अवघड स्वरुप लक्षात घेऊन’ नव्याने एकत्रित अभ्यास केला जाणार आहे. यात काही नव्या बाबी समोर आल्यास प्रकल्पांचा खर्च मोठय़ा प्रमाणात फुगण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यपद्धतीनुसार प्रकल्पांचा सुसाध्यता अहवाल तयार करुन विविध सर्वेक्षणे, तपासण्या केल्या जातात. त्यानंतर सविस्तर अहवालातील अंदाजपत्रकानुसार निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटे दिली जातात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे आणि आसपासच्या शहरांमधील हजारो कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांची आखणी प्राधिकरणाकडून करण्यात आली. मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हपर्यंत भुयारी मार्ग बांधणीचे महत्त्वाचे आणि तांत्रिकदृष्टय़ा अवघड काम नुकतेच एल. अँड टी. कंपनीस प्रदान करण्यात आले आहे. यासह अन्य सहा मोठय़ा प्रकल्पांची कामे एकमेकांना पूरक असून ती तितकीच आव्हानात्मक असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्यामुळेच संरचनात्मक आराखडे, अंदाजपत्रके तसेच इतर तांत्रिक बाबींची नव्याने पडताळणी करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.
हेही वाचा >>>आझाद मैदानावर आझाद शिवसेनेचा मेळावा होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या प्रकल्पांच्या अभ्यासासाठी प्राधिकरणाने मेसर्स टाटा कन्सिल्टग इंजिनिअर्स लिमीटेड कंपनीची २० कोटी २० लाख रुपये देऊन सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. पुनर्विलोकनानंतर सुचविण्यात आलेल्या कामांचा मुळ अंदाजपत्रकात अंतर्भाव केला जाणार आहे. त्यामुळे खर्च वाढणार हे स्पष्ट असून काही कामांच्या नव्याने निविदा मागविण्याची तयारीही प्राधिकरणाने केली आहे. याबाबत एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी तसेच जनसंपर्क विभागाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
अर्धवट अभ्यासावर कंत्राटे बहाल?
या सर्व प्रकल्पांचे सुसाध्यता अहवाल यापुर्वीच्या सल्लागारांमार्फत करण्यात आले आहेत. त्यातील अंदाजपत्रकानुसार काही कंत्राटे वाटली गेली आहेत. मात्र आता अनेक महत्वाच्या बाबींचा पुरेसा अभ्यास झाला नसल्याच्या धक्कादायक ‘साक्षात्कारा’बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह प्रस्तावित बोगद्याच्या जागेवर मृदू स्वरुपाच्या मातीचा थर अपेक्षित आहे. तेथे भूवैज्ञानिकांमार्फत सखोल तपासणी झालेली नाही. याशिवाय पुर्व मुक्तमार्गावरुन येणारी वाहतूक गिरगाव चौपाटीमार्गे याच रस्त्यावर येणार असल्याने त्याच्या सखोल अभ्यासाची गरज प्राधिकरणाला आता वाटू लागली आहे.
हेही वाचा >>>कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? बावनकुळे म्हणाले…
१३.८ किलोमीटर लांबीच्या बाळकूम-गायमुख खाडी किनारा मार्गात दीड किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. तर ६० टक्के मार्ग उन्नत स्वरुपाचा आहे. या कामाच्या तपासणीकरीता तज्ज्ञांची आवश्यकता असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
पुर्व मुक्तमार्गाचा ठाण्यातील छेडानगपर्यंत विस्तार करताना सात महत्वाची जंक्शन आणि ६ उड्डाणपूलांसाठी वाहतूक सर्वेक्षण आणि नियोजनाचा सखोल अभ्यास करायला हवा असे प्राधिकरणास वाटत आहे.
शीळफाटा-काटई उन्नत मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०१३ मध्ये तयार केला गेला होता. या प्रकल्पाचे सर्वेक्षणही संक्षिप्त स्वरुपाचे झाले आहे.
या प्रकल्पांचे खर्च वाढणार?
प्रकल्प सध्याचा खर्च
ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग ६,५०० कोटी
ठाणे खाडी किनारा मार्ग २,१७० कोटी
पूर्व मुक्त मार्गाचा ठाण्यापर्यंत विस्तार २,०७० कोटी
आनंदनगर-साकेत उन्नत मार्ग १,६०० कोटी
शीळफाटा-काटई उन्नत मार्ग ९०७ कोटी
ठाणे खाडी पूल १,६९८ कोटी
कल्याण वळण रस्ता ४०० कोटी