लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: ठाणे जिल्ह्यात विविध राज्यमार्ग आणि महामार्गाचे काम सुरू असले तरी यामध्ये संलग्नता नसल्याने शहरांतर्गत वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो आहे. त्यामुळे हे मार्ग एकमेकांना जोडण्यासाठी वर्तुळाकार रस्त्यांची उभारणी करण्यासाठी एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्या असून गुरुवारी झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच नामांकित सल्लागार कंपन्यांना आमंत्रित करून त्यांच्याकडून याबाबतचा आराखडा तयार करून घेतला जाणार आहे.
विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरे विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटात वाहन चालकाला महामार्गाला पोहचता यावे, यासाठी ही सर्व शहरे आणि महत्त्वाचे रस्ते वर्तुळ रस्त्यांनी जोडण्याची मागणी नुकत्याच झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनीही सकारात्मक भूमिका घेत या नव्या मार्गाचे आखणीसाठी नामांकित सल्लागारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले. या सर्व शहरांमधून जाणारे मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास अवघ्या काही मिनिटांत वाहन चालक शहराबाहेर पडू शकेल. सध्या शहरातून महामार्गांवर पोहोचण्यासाठी वाहन चालकाला मोठा वेळ खर्ची घालवा लागतो.
आणखी वाचा-सॅटीस पुलाऐवजी काही बसगाड्यांची वाहतूक गावदेवीमधून, ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा निर्णय
सोबतच मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षात नवनवीन राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारणी सुरू आहे. या सर्व मार्गांसाठी संलग्नता करणे आवश्यक आहे. ही संलग्नता करण्यासाठी संपूर्ण महानगर प्रदेशाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज असून यासाठीही आता एमएमआरडीएने पुढाकार घेणार आहे. यासाठी महानगर प्रदेशातील सर्व महापालिकांच्या प्रमुखांना बोलावून त्या संदर्भात बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे. याची अमलबजावणी झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे.
कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ च्या कामालाही लवकर सुरुवात होणार असून त्याची निविदा येथे दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मेट्रो १२ चे काम जलद गतीने सुरू असून या निवेदेनंतर मेट्रोच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.