ठाणे : चार शिक्षिकांसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून एका महाविद्यालयाच्या प्राचार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप देत श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ठाण्यातील महाविद्यालयात घडलेल्या याप्रकरामुळे खळबळ उडाली आहे.
ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील रामनगर भागात एक महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील प्राचार्य हा गैरवर्तन करत असल्याचा आरोप चार शिक्षिकांनी केला आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शिक्षिकांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना ही बाब सांगितली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी महाविद्यालयात जाऊन प्राचार्यला जाब विचारत चोप दिला. या प्रकारामुळे शाळेत गोंधळ उडाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या प्राचार्याला पकडून श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात प्राचार्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत
महाविद्यालयातील चार शिक्षिका आमच्या कार्यालयात आल्या होत्या. महाविद्यालयातील प्राचार्य गैरवर्तन करत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार आमच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्यला जाब विचारत चोप दिला आणि त्यानंतर त्याला श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. असे प्रकार होऊ नयेत यासाठी सर्वच खासगी शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि प्राचार्य यांच्या खोलीत सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र देणार आहे, असे मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सांगितले.