बदलापूर : बदलापुरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या आणि काही जुन्या दुकानांवर अद्यापही मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. मराठी पाट्यांच्या या मुद्द्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदलापूर शाखेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठी भाषादिनानिमित्त पाट्या मराठी न केल्यास त्या पाट्यांना काळे फासले जाईल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

बदलापुरात सध्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणांवर कारवाई करत रस्ते आणि पदपथ मोकळे केले जात आहेत. एकीकडे ही कारवाई सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी पाट्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. नुकतेच मनसेच्या वतीने शहरातील दुकानांमध्ये धडक दिली. यावेळी बदलापुरातील दुकानांवर असलेल्या मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसैनिक आणि दुकानदारांमध्ये जोरदार वाद झाले. याच मुद्द्यावरून मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने त्यापूर्वी दुकाने आणि आस्थापनच्या पाट्या मराठीत करण्यासाठी मनसेने दुकानदारांना आवाहन केले आहे.

बदलापूर शहरात अनेक दुकाने, आस्थापने आणि खाजगी कार्यालयांवर इंग्रजी भाषेत पाट्या लावण्यात आल्या आहे. या पाट्यांच्या विरूद्ध मनसेच्या महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेत या दुकानदारांना इशारा दिला आहे. या पाट्या मराठीत करण्यासंदर्भात पत्र देत मराठी भाषा दिनाच्या दिवशी दुकानावर मराठी पाट्या दिसायल्या हव्यात, असे आवाहन मनसैनिकांनी केले आहे. दुकानांच्या पाट्या मराठीत न केल्यास त्यांना काळे फासले जाईल, असा इशारा मनसैनिकांनी यावेळी दिला. यावेळी दुकानदारांसोबत मनसैनिकांचे वादही झाले. यावेळी मनसेच्या महिला आघाडीच्या संगीता चेंदवणकर, नंदा पांढरे, चित्रपट सेनेचे गणेश पिल्लई आणि इतर महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader