टपाल कार्यालयातील भरती प्रक्रीयेत मराठी मुलांना डावलण्यात आल्याचा आरोप करत, ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुधवारी स्थानक परिसरातील टपाल कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या भरती प्रक्रीयेत मराठी मुलांना सामावून घेतले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
ठाणे स्थानक परिसरातील टपाल कार्यालयाबाहेर मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले. सहायक पोस्ट मास्तर जनरल (भरती) यांच्या सहीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भरती आणि नियुक्ती पत्र पाठविण्यात आले आहेत. या पत्रातील उमेदवारांच्या यादीत सर्व उमेदवार अमराठी आहेत. २७५ जणांपैकी एकही मराठी उमेदवार नसणे हा सरळसरळ भरती प्रक्रियेतील महाघोटाळा आहे. या प्रक्रियेमध्ये वरिष्ठ स्तरावरून षडयंत्र रचून जाणीवपूर्वक मराठी मुलांवर अन्याय केल्याचे दिसून येत आहे, असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष मोरे यांनी आंदोलनादरम्यान केला.
तसेच, मराठी मुलांवर अन्याय होणार असेल तर भरती प्रक्रीया होऊ देणार नाही. या भरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देण्यात यावी. तसेच भरती प्रक्रीया पुन्हा नव्याने करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.