ठाणे : ठाणे जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास मनाई केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. आयसीएसई आणि सीबीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजीतच संवाद साधण्याची सक्ती केली जात असून, मराठीत बोलण्यास मनाई केली जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्याचे मनसेचे म्हणणे आहे. मनसेने याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांची भेट घेऊन अशा शाळांवर कारवाई करावी असे निवेदन दिले.
शासकीय विभागात मराठीचा वापर करावा यासाठी पदाधिकाऱ्यांना सक्रीय राहण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले होते. या आदेशानंतर ठाण्यात मनसेआक्रमक झाली आहे. मनसेचे पदाधिकारी बँकेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी वापरण्यास मनाई केली जात असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
पालकांची तक्रार काय?
महाराष्ट्र राज्यात मराठी ही अधिकृत भाषा असून, राज्य सरकारने शासन निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये मराठी भाषेला योग्य स्थान देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये या निर्णयाचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा बोलण्याची सक्ती केली जात आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात, शाळेच्या आवारात किंवा इतरत्र मराठीत संवाद साधण्यास शिक्षण संस्थेतर्फे मनाई केली जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे असे मनसेचे म्हणणे आहे.
मनसेचा आरोप काय?
गणित, विज्ञान, इतिहास यांसारख्या विषयांचे अध्यापन इंग्रजीतूनच आहे त्यामुळे इंग्रजी बोलण्यात मुले पारंगत झाली आहेत मात्र मराठी भाषेत संभाषण करू शकत नाहीत हा दुष्परिणाम होतो आहे असे सांगण्यात आले आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर भाषिक बंधने लादल्याने त्यांच्यातील मराठी भाषेचा आत्मविश्वास कमी होत आहे. महाराष्ट्र राज्यात मराठी ही प्रमुख भाषा असूनही काही शाळा इंग्रजीच्या प्राधान्यामुळे मातृभाषेची गळचेपी करत असल्याचा आरोप मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला आहे.
इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना लहानपणा पासूनच मराठी बोलायची गरज नाही, असे शिकवले गेल्यामुळे भविष्यात या मुलांना मराठी भाषे विषयी पर्यायाने महाराष्ट्रा विषयी आत्मीयता उरणार नाही. महाराष्ट्रात शिकणाऱ्या मुलांना लहान वयातच राजभाषे विषयी आदराची भावना निर्माण करणे गरजेचे आहे. मराठी फक्त परीक्षेत मिळणाऱ्या गुणांसाठीची भाषा असा समज निर्माण होतोय. महाराष्ट्राची थोर संत परंपरा, जाज्वल्य इतिहास, शौर्यगाथा याविषयी आवड निर्माण होण्याकरिता संभाषण मराठीतूनच झाले पाहिजे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मनविसेच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष निलेश वैती, सचिन सरोदे, प्रमोद पत्ताडे, अमित मोरे, राकेश आंग्रे, हेमंत मोरे, सागर वर्तक तसेच इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
तर मराठीचा सन्मान
शिक्षण विभागाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतल्यास मराठी भाषेचा सन्मान राखला जाईल आणि विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत संवाद साधण्याचा स्वाभिमान टिकून राहील. काही शाळा राज्यगीत देखील लावत नाहीत. याप्रकरणी शिक्षण विभागाने सर्व शाळांची तपासणी करून अशा शाळांवर कारवाई करावी.- संदीप पाचंगे,सरचिटणीस, मनविसे.