ठाणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सत्तेत असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश करण्याची मालिका सुरु झाली असून शुक्रवारी मनसेचे ठाण्यातील माजी विभाग अध्यक्ष महेश कदम आणि भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख नितीन मधुकर वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला असून या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीपाठोपाठ मनसेलाही गळती लागल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>> वंदे भारत एक्सप्रेसला आसनगाव, कसारा येथे थांबा देण्याची मागणी
शिवसेनेतील बंडाळीचे आणि राज्यातील सत्ताबदलाचे केंद्र असलेल्या ठाणे जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठे समर्थन मिळत असून त्याचा फटका ठाकरे गटाला बसताना दिसून येत आहे. त्याचबरोबर आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांची शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळा लावून त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली असून अशाचप्रकारे रविवारी लोकमान्यनगर भागात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह चार माजी नगरसेवक हे बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या भागातील मनसेचे शाखाअध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनीही काही दिवसांपुर्वी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्यापाठोपाठ आता माजी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा >>> ठाकुर्लीतील कचोरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी
या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीपाठोपाठ मनसेलाही गळती लागल्याचे दिसून येत आहे. २००९ मध्य झालेल्या निवडणुकीत महेश कदम यांनी मनसेच्या तिकीटावर कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणुक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. कदम हे स्वामी फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सामाजिक काम करीत आहेत. त्यांनी भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. त्यावेळी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर हे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या काही तासांपूर्वी माझा भाजपात प्रवेश होत आहे. याबद्दल मी भाग्यवान आहे. सध्याच्या परिस्थितीत हिंदूत्वाचा केंद्रबिंदू हा भाजपाच आहे. ते लक्षात घेऊन भाजपामध्ये सहभागी झालो, अशी प्रतिक्रिया महेश कदम यांनी व्यक्त केली.