ठाणे : आपले मुख्यमंत्री सत्तेत येण्याआधी आपल्याला टोलमुक्त ठाण्याचे आश्वासन मिळाले होते, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर येत्या १ ऑक्टोबर २०२३ पासून आपल्याला पुन्हा टोल वाढीला सामोरे जावे लागणार आहे, अशी टीका मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. टोल माफ करण्याचे आमिष दाखवून निवडून आले, मंत्री आणि आता मुख्यमंत्रीही झाले. तरीही ठाणेकरांना दिलेले आश्वासन पूर्ण का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला असून त्याचबरोबर मनसेकडून उभारण्यात येत असलेल्या टोलविरोधातील जनआंदोलनात सामील होण्याचे आवाहन त्यांनी ठाणेकरांना केले आहे.

मनसेचे नेते अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी टोल वाढीविरोधात काही दिवसांपूर्वी आनंदनगर टोल नाक्यावर आंदोलन केले होते. या आंदोलनप्रकरणी मुंबईच्या नवघर पोलिसांनी त्यांना अटक करून नोटीस देऊन सुटका केली होती. त्यापाठोपाठ जाधव यांनी टोल वाढीविरोधात जन आंदोलन उभारणीची तयारी सुरू केली असून त्यात ठाणेकरांना सामील होण्याचे आवाहन केले आहे. मागील अनेक वर्ष ठाणेकर हा टोल पासून त्रस्त आहे. अनेक आश्वासन दिली गेली, अनेक आंदोलन झाली. परंतु टोल बंद होण्याची कुठलही चिन्ह दिसत नाही. असे असताना महाराष्ट्राला ‘ठाणेकर’ मुख्यमंत्री लाभला, आपले मुख्यमंत्री सत्तेत येण्याआधी आपल्याला टोलमुक्त ठाण्याचे आश्वासन मिळाले होते, परंतु ते मुख्यमंत्री झाल्यानंतर येत्या १ ऑक्टोबर २०२३ पासून आपल्याला पुन्हा टोल वाढीला सामोरे जावे लागणार आहे, अशी टीका जाधव यांनी केली आहे.

हेही वाचा >>>उल्हासनगरात टँकरच्या स्फोटात चौघांचा मृत्यू; सेंच्युरी रेयॉन कंपनीतील घटना

टोल वाढीमुळे ठाणेकरांच्या खिशाला आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांना कात्री लागणार आहे. टोल माफ करण्याचे आमिष दाखवून निवडून आले, मंत्री झाले, आता मुख्यमंत्रीही झाले, तरीही ठाणेकरांना दिलेले आश्वासन पूर्ण का होत नाही, आपल्याशी भावनिक खेळ खेळला जात आहे का , असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. माझा पक्ष या विषयावर गेली अनेक वर्ष आवाज उठवत आहे आणि यापुढेही उठवत राहील, परंतु एक ठाणेकर म्हणून तुमची देखील जबाबदारी असून या सगळ्यात आपण देखील सहभागी होण गरजेचे आहे. येत्या ३१ सप्टेंबरपासून या टोलवाढी विरोधात मी आपल्यासाठी एक जन आंदोलन उभे करत आहे, यात तुमचे सहकार्य मिळावे, असे आवाहन त्यांनी ठाणेकरांना केले आहे.

हेही वाचा >>>सात सट्टेबाजांना अटक, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर सुरू होता सट्टा

ठाणेकरांनी मुख्यमंत्र्यांना भरभरून प्रेम दिले आहे आणि मुख्यमंत्र्यांचेही ठाणेकरांवर तितकच प्रेम आहे. ते ठाणेकरांच्या हिताचे निर्णय घेत असतात आणि यापुढेही असे निर्णय नक्कीच घेतील. त्यामुळे ठाणेकरांच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी काय करायला हवे हे इतरांनी शिकवण्याची गरज नाही. यापूर्वीही टोलविरोधातील आंदोलने झाली असून ही आंदोलने मुंबई आणि ठाणेकरांनी पाहिली आहेत. त्यावर मला अधिक भाष्य करायचे नाही. तसेच गणेशोत्सवाचा काळ असल्याने कोणावरही टिका करायची नाही. मनसेला त्यांच्या आंदोलनासाठी शुभेच्छा आहेत.- नरेश म्हस्के, शिवसेना राज्य प्रवक्ते

Story img Loader