ठाणे- शहरातील कोलशेत भागात मॅक्रोटेक डेव्हलपरच्या ( लोढा ग्रुप ) एका प्रकल्पात ग्राहकांनी पैसे गुंतवले होते. परंतू, यातील काही ग्राहकांचे बँकेचे कर्ज मंजूर झाले नसल्यामुळे त्यांनी घरांची नोंदणी रद्द करुन सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम परत करण्याची मागणी केली. परंतू, या बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांचे पैसे परत करण्यास विरोध केला.
त्यामुळे मॅक्रोटेक डेव्हलपर ( लोढा ग्रुप ) विरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी गुरुवारी आंदोलन केले. यावेळी मनसेने व्यावसियाकाविरोधात विविध आशयाचे फलक हातात घेतले होते. यावेळी फसवणूक झालेले ग्राहकांसमोर त्यांनी लोढाच्या कर्मचाऱ्यांना याप्रकरणी जाब विचारला. दरम्यान मॅक्रोटेक डेव्हलपरच्या ( लोढा ग्रुप ) यांनी या प्रकरणी आपलं म्हणणं मांडत हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा खुलासा केला आहे. तसेच या प्रकरणातील व्यक्तीने घर रद्द करण्यासाठी अर्ज केला होता, तेव्हापासून वैद्यकीय परिस्थितीमुळे पुढील प्रक्रिया करण्यासाठी ते आमच्याकडे परत आलेले नाहीत असेही बिल्डरने म्हंटलं आहे.
घोडबंदर भागातील कोलशेत परिसरात लोढा बांधकाम व्यावसायिकाचा लोढा हमारा गृह प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये अनेक मध्यमवर्गी कुटुंबाने घरांची नोंदणी केली आहे. नोंदणी करताना त्यांनी लाखो रुपये बांधकाम व्यावसायिकाकडे भरले होते. परंतू, यातील अनेक कुटुंबांचे बँकेचे कर्ज मजूर झाले नाही. तर, अनेकांच्या घरातील काही समस्यांमुळे त्यांच्यावर घराची नोंदणी रद्द करण्याची वेळ आली आहे.
ग्राहकांनी यासंदर्भात बांधकाम व्यावसायिकाला सांगितले. परंतू, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या सर्व ग्राहकांनी एकत्रित येत, मनसेचे अविनाश जाधव यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा बांधकाम व्यावसायिकाला मनसेच्या वतीने या ग्राहकांची नोंदणी रद्द करुन त्यांनी भरलेली अनामत रक्कम परत करण्याची विनंती केली होती.
मात्र, बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांनी भरलेले पैसे परत देण्यास विरोध केला. यामुळे संतप्त ग्राहकांनी मनसेचे अविनाश जाधव आणि इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांसह बांधकाम व्यावसायिका विरोधात गुरुवारी आंदोलन केले. यावेळी मनसेचे कार्यकर्ते हे बांधकाम व्यावसायिका विरोधात विविध आशयाचे फलक हाती घेऊन घोषणा देत होते. यावेळी अविनाश जाधव यांनी लोढाच्या कर्मचाऱ्यांना याप्रकरणी जाब विचारला.
ग्राहक प्रतिक्रिया
या गृहप्रकल्पात मी २०२१ मध्ये ५४ हजार रुपये भरुन घराची नोंदणी केली होती. त्यानंतर, काही कालावधीत २ लाख ७५ हजार रुपये भरले. परंतू, घरातील काही समस्येमुळे मला घराची नोंदणी रद्द करण्याची वेळ आली. त्यावेळी मला मी भरलेले पैसे लगेच मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप संबंधित व्यावसायिकाकडून मला माझे पैसे परत मिळाले नाही. माझ्यासारखे असे आणखी ग्राहक आहेत, की त्यांनाही त्यांचे पैसे मिळालेले नाही, अशी प्रतिक्रिया एका ग्राहकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
बिल्डरचा खुलासा
आजच्या निषेधादरम्यान झालेल्या आरोपांमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आंदोलकांनी एका महिलेचे घर रद्द केल्याचा प्रकार अधोरेखित केला. आम्ही अर्ज आणि रेरानुसार रक्कम परत केली आणि तिने आम्हाला पूर्ण आणि अंतिम समझोता पत्र देखील दिले. यामध्ये ‘माझा निवासी फ्लॅटच्या संबंधातील हक्क, मालकी हक्क, हितसंबंध संपला आहे. मी पुढे वचन देतो आणि सहमत आहे की मी तुमच्या आणि निवासी घराच्या संदर्भात कोणतेही दावे किंवा मागणी करणार नाही. तसेच कोणतेही विधान, वाद आणि आरोप करणार नाही, असे तिने २२ ऑगस्ट २०२४ रोजी आम्हाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आज आंदोलनाचे नेतृत्व करणारी तीच व्यक्ती आमच्याकडे आली होती. आणि तिच्या खटल्याची गती वाढवण्याची विनंती करत होती.
आंदोलनात उल्लेख केलेल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये, त्या व्यक्तीने २०२१ मध्ये घर रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. तेव्हापासून वैद्यकीय परिस्थितीमुळे पुढील प्रक्रिया करण्यासाठी ते आमच्याकडे परत आलेले नाही. आम्हाला आजच याबद्दल माहिती मिळाली. आता आम्ही त्याच्या खटल्याची प्रक्रिया करणार आहोत, असे या खुलासा मध्ये सांगण्यात आले आहे.