ठाणे : गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्यावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सक्रीय होण्याचा इशारा देताच, मंगळवारी मनसेचे पदाधिकारी ठाण्यातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत शिरले. तसेच येथील इंग्रजी भाषेतील फलक काढून टाकले. मराठीचा वापर केला नाही तर रोषाला सामोरे जावे लागेल असे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. तसेच, मराठी भाषा वापरणार नसाल, तर मार खाल असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. सर्व शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. तसेच, पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या वापरासाठी सक्रीय भूमिका घेण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसेचे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह कार्यकर्ते भारतीय स्टेट बँकेच्या एका शाखेत शिरले. तिथे त्यांनी इंग्रजी भाषेतील फलक काढून टाकले. तसेच बँकेच्या अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांना मराठी भाषेचा वापर करण्याची सूचना केली.

अविनाश जाधव म्हणाले की, या शाखेत मराठी बोलली जात नसल्याची तक्रार एका महिलेने केली होती. त्यामुळे या शाखेत आम्ही गेलो होतो. अधिकाऱ्याच्या केबीनमध्येही इंग्रजी फलक होते. हे फलक मराठी करण्याच्या सूचना अधिकाऱ्याला केल्या. या कार्यालयात सर्व मोठ्या हुद्द्यावर राज्याबाहेरील लोक आहेत. येथे मराठीचा कुठेच वापर केला जात नाही. या बँकेच्या शाखेत सुमारे ९५ टक्के बँक खाती मराठी माणसांची आहेत. येथे जास्तीत जास्त मराठी माणसे कामाला असणे आवश्यक होते. यांना आज ताकीद दिली आहे. जर बदल केला नाही तर त्यांना रोषाला सामोरे जावे लागणार असा इशारा जाधव यांनी दिला. ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी बँकेत मनसेचे पदाधिकारी जाऊन मराठी भाषा वापरा बाबत निवेदन देतील. जर मराठी भाषेचा वापर करणार नसला तर मार खाल असेही जाधव यांनी सांगितले. जिथे मराठीचा अपमान होईल तिथे आमची हात आणि लाथ बसणारच असेही जाधव म्हणाले.

महाराष्ट्रात ‘ठाकरे’ हा ब्रँड आहे. ठाकरे यांच्याकडील आमदार, खासदारांच्या संख्येवर ठाकरे यांची गिणती करु नका. पुढील अनेक पिढ्या ठाकरे ब्रँड कायम राहिल. बाकी किती येतात आणि जातात, पुढील १०० वर्ष ठाकरे हेच महाराष्ट्रावर राज्य करणार असेही जाधव म्हणाले.