लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली : बदलापूर येथील दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बदलापूर आणि डोंबिवली येथील त्यांचे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूर येथील एका शाळेत दोन बालिकांसोबत घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असल्याने या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करणे योग्य वाटत नसल्याने मनसेने हा निर्णय घेतला आहे, असे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी सांगितले.

बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन बालिकांसोबत लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्यानंतर या बालिकांसह त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात नेण्यात, तेथे शाळेतील आरोपी नराधामावर गुन्हा दाखल करून घेण्यात मनसेच्या बदलापूर मधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. आता तर मनसेच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी शहर परिसरातील शाळांमध्ये जाऊन शाळा व्यवस्थापनांना मुलींच्या सुरक्षिततेबाबत घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक शाळेला एक छापील पत्रक देऊन मनसे पदाधिकारी त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी शाळा व्यवस्थापनाने करावी म्हणून प्रयत्न करत आहेत.

आणखी वाचा-ठाणे : क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक

बदलापूमधील पीडित दोन कुटुंब घरात घडलेल्या प्रकारामुळे दुखी असतील तर संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे हे समाजाने पण दाखविणे आवश्यक आहे. या पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मनसे त्यांच्या सोबत असणार आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले. दहीहंडी उत्सव हा वर्षातून एकदा येणार उत्सव आहे. तो अनेक वर्ष डोंबिवलीत आम्ही उत्साहाने साजरा करतो. यावेळी बदलापूरमधील निंदनीय घटनेचे सावट या उत्सवावर आहे. त्यामुळे बदलापूर, डोंबिवली शहरातील मनसेने आयोजित केलेला दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

डोंबिवली पूर्वेतील चार रस्ता भागातील पाटणकर चौकातील फडके वॉच दुकानाच्या बाजुला डॉ. राजेंद्र प्रसाद रस्त्यावर मनसेतर्फे अनेक वर्ष दहीहंडी उत्सव साजरा केला होता. या उत्सवामुळे या भागातील वाहतुकीत वाहतूक विभागाने बदल केला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns cancel dahi handi in dombivli and badlapur mrj