डोंबिवली – लोकसभा निवडणुकीत महायुतीचा एक समर्थक पक्ष म्हणून मनसेने महायुतीच्या उमेदवारांचे काम त्यावेळी केले. आता महायुती आणि मनसे समोरासमोर निवडणूक लढवित आहेत. महायुतीने मनसे उमेदवारांच्या मतदारसंघात उमेदवार देऊ नये असे ठरले नव्हते किंवा तशी अपेक्षाही नव्हती. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेने उमदेवार दिला असला तरी त्याचे अजिबात आश्चर्य नाही, असे मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार आमदार राजू पाटील यांनी येथे स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसेतर्फे फडके रस्त्यावर दिवाळी पहाटनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. हिंदुत्वाची विचारधार सक्षमपणे पुढे घेऊन जाणारे उमेदवार आमच्यासमोर होते. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी महायुतीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. महायुतीला समर्थन दिले म्हणून त्यांनी त्याची परतफेड करावी किंवा अन्य काही मागण्या घेऊन महायुतीला मनसेने अजिबात समर्थन दिले नव्हते. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर ज्या मागण्या केल्या होत्या, त्यामधील एक मागणी मान्य झाली, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>कल्याण ग्रामीणचा निर्णय वरिष्ठांचा ! खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती

लोकसभा निवडणुकीनंतर मनसे पुन्हा स्वतंत्र बाण्याने काम करू लागली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला समर्थन दिले म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीने मनसेला साथ द्यावी, अशी अपेक्षा मनसेने कधीच केली नाही. कल्याण ग्रामीणमध्ये आपण उमेदवार आहोत. आपण खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम केले आहे म्हणून शिवसेनेने या मतदारसंघात उमेदवार देऊ नये असे आपणास कधी वाटले नाही किंवा तशी अपेक्षा करणे योग्य नाही. आता मनसे स्वतंत्र बाण्याने लढत आहे. समोर महायुतीचे उमेदवार आहेत, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आली तरी शिवसेनेकडून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदार राजू पाटील यांनी खासदार डाॅ. शिंदे यांचे काम केले होते. त्याची परतफेड करण्यासाठी शिवसेने कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवार देणार नसल्याची आणि शिवसेना, मनसेचे या विषयावर समझोता झाला असल्याची जोरदार चर्चा होती. आमदार पाटील यांच्या स्पष्टक्तीने या विषयावर पडदा पडला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेने राजेश मोरे यांना उमेदवारी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns candidate mla raju patil candid speech regarding shiv sena candidature amy