लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: मुलुंड टोलनाक्याजवळ शनिवारी सकाळी मनसेने साखळी आंदोलन केले. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वखाली हे आंदोलन झाले. उद्यापासून टोल दरवाढ होणार आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. तसेच आता जनतेला या आंदोलनात सहभागी करून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मुलुंड येथील टोल नाका जवळ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी आंदोलन केले. उद्यापासून टोलवाढ होणार आहे. आम्ही टोल प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत आहोत. आम्हाला १९९९ चा करार दाखवला जातो. त्यावेळी वाहनांची संख्या कमी होती. आता वाहनांची संख्या हजोरोने वाढली आहे. मुलुंड टोलनाका पाच वर्षांपूर्वी बंद होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही.टोल वसुली सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू असे म्हटले होते. आता जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत,असा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.
आंदोलनाचा पुढील टप्पा जनतेमध्ये जनजागृती करण्याचा आहे. आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत. आमचे आंदोलन हिंसक होऊ देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनावेळी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे सरचिटणीस संदीप पचांगे , मनसे जनहित विधी विधी शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.