महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तरसभा घेण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जे तारे तोडले त्यानंतर त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं वाटल्याने सभा घेतल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच काही पक्षांचे बांधिल असलेल्या पत्रकारांनी विषय भरकटवला असता म्हणून पत्रकार परिषद घेतली नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
राज ठाकरे म्हणाले, “गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जे तारे तोडले त्यानंतर त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं वाटलं. पण मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं. मी पत्रकार परिषद घेतली असती, तर या पक्षांना बांधिल असलेल्या पत्रकारांनी विषय भरकटवला असता. म्हणून मी ठाण्यात सभा घेण्याचा निर्णय घेतला.”
“राजकीय पक्षांशी संबधित असलेल्या पत्रकारांनी कंडू शमवून घेतला. अनेक चांगले पत्रकार हे भामट्या पत्रकारांमुळे मागे पडले आहेत. टीका करायची तर काय इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांचे बोलणे हे खरडवायचं,” असं म्हणत राज ठाकरेंनी पत्रकारांवरही टीका केली.
“राज्य सरकारला जे करायचंय ते करावं, आम्ही मागे हटणार नाही”
राज ठाकरे म्हणाले, “मशिदींवरील भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कोठे आहे? तुम्हाला जो नमाज पढायचा आहे, अजान द्यायची आहे ते घरात करा. शहरांचे रस्ते, फूटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय? हे भोंगे खाली उतरवा, आम्हाला त्रास देऊ नका हे सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार.”
“कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत”
“वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नाहीच, हा सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सर्वांना या गोष्टीचा त्रास होतो. तुम्ही दिवसभरात ५-५ वेळा नमाज पढता, बांग देता. एकतर सगळे बेसूर असता. काय म्हणून आम्ही ऐकायचं? रस्त्यावर घाण झाली तर आपण रस्ता साफ करतो. फुटपाथवर घाण झाली तर फुटपाथ साफ करतो, मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
“आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा”
राज ठाकरे म्हणाले, “राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. परदेशात अनेक देशांमध्ये बंदी आहे, तिथं निमुटपणे ऐकता ना? माझे अनेक मुस्लीम परिचयाचे लोक आहेत जे येऊन सांगतात की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. असो कोणता धर्म आहे जो दुसऱ्या धर्मियांना त्रास देतो.
“काही सणवार असेल तर समजू शकतो, पण…”
“आज तुमचा रमजान सुरू आहे आम्ही समजू शकतो. आमचाही गणपती उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो. १० दिवस आम्ही समजू शकतो, तरीही १० दिवस लाऊडस्पिकर कमीच लावला पाहिजे तो भाग वेगळा. काही सणवार असेल तर समजू शकतो, पण तुम्ही जेव्हा ३६५ दिवस लाऊड स्पिकरमधून या गोष्टी ऐकवतात कशासाठी, कोणासाठी?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
“कोणताही तेढ, दंगल आम्हाला निर्माण करायच्या नाहीत”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “३ मार्चला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की कोणताही तेढ, दंगल आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. आम्हाला ती इच्छा नाही, आम्हाला महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडवायचं नाही. आज १२ एप्रिल आहे ते ३ मे या काळात महाराष्ट्रातील सर्व मशिदींमधील मौलवींना बोलावून त्यांना सांगा. सर्व मशिदींवरील लाऊड स्पिकर उतरले गेले पाहिजे. ३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही.”
“१८ जुलै २००५ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल”
“१८ जुलै २००५ चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की इतरांची शांतता बिघडवून तुम्ही तुमची प्रार्थना करा किंवा मोठे ध्वनीक्षेप किंवा मोठी वाद्य वाजवून प्रार्थना करा असं कोणताही धर्म सांगत नाही. आमच्यामते समाजात धर्माच्या नावाने म्हातारी माणसं, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांची पहाटेची झोप बिघडवणं, दिवस खराब करणं आणि बाकीच्यांचा दिनक्रम विस्कळीत करणं अशा गोष्टींना मुळीच परवानगी देता कामा नये,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.
“…तर संपूर्ण देशात जिथं नमाज लागेल तिथं हनुमान चालिसा लागलाच पाहिजे”
“सर्वोच्च न्यायालयाने ही गोष्ट सांगितली असेल तर राज्यातील गृहखात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय अडचण आहे? हे होत का नाही? ३ मेपर्यंत भोंगे उतरले नाही, तर संपूर्ण देशात जिथं नमाज लागेल तिथं हनुमान चालिसा लागलाच पाहिजे असं मी सर्व हिंदूना सांगतो,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.