Raj Thackeray to Visit Badlapur on 26th: गेल्या दोन दिवसांपासून बदलापूरमधील आंदोलन आणि त्याला कारणीभूत ठरलेला शहरातल्या आदर्श शाळेतला धक्कादायक प्रकार या गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे. आदर्श शाळेत अक्षय शिंदे नावाच्या कर्मचाऱ्याने शाळेतल्या तीन वर्षांच्या दोन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आणि नागरिकांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. मंगळवारी बदलापूरकरांनी तब्बल १० तास रेलरोको करून आरोपीला तिथल्या तिथे फाशी देण्याची मागणी केली. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणात आपल्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडलं बदलापूरमध्ये?

तीन दिवसांपूर्वी उजेडात आलेली ही घटना घडली १३ ऑगस्ट रोजी. शाळेतल्या दोन अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर शाळेतच नोकरीला असणाऱ्या अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं लैंगिक अत्याचार केले. तीन दिवसांनंतर मुलींनी आपल्या पालकांकडे यासंदर्भात उल्लेख केल्यानंतर हे सगळं प्रकरण उजेडात आलं. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आदर्श शाळेत तोडफोड केली. दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकात मंगळवारी दिवसभर रेलरोको करण्यात आला. बदलापुरात घडलेल्या या घटनेवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बदलापुरातील पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांना व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आवाहन केलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून यासंदर्भातला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राज ठाकरेंनी पीडित मुलींना कुणी भेटायला जाणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. “आता एकच गोष्टीची काळजी घ्या. सारखे सारखे लोक येतील आणि त्या मुलींना व त्यांच्या घरच्यांना भेटून भेटून छळतील. त्या मुलींना आयुष्यभराचा त्रास देतील. त्यांचं घर कुणाला कळणार नाही, त्यांचं नाव कळणार नाही याची दक्षता घ्या. पोलिसांशी बोलून घ्या. त्यांच्या घरी कुणी जाणार नाही, त्यांना छळणार नाही, त्या मुलींना कुणी त्रास देणार नाही याची काळजी घ्या. त्या दोघींच्या पुढे आयुष्य पडलंय. त्या मुली लहान आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

“या सगळ्या प्रकरणात इतर कुणी राजकारणी भेटतील किंवा काय करतील मला माहिती नाही. पण आपल्याकडून ही गोष्ट घडता कामा नये. त्यांच्या घरच्यांनाही आधार द्या. त्यांना समजावून सांगा. त्या मुलींना त्रास होणार नाही एवढं फक्त बघा”, असं राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

“बदलापूरची घटना मनसे पदाधिकाऱ्यांमुळे उघड,” राज ठाकरे यांचा दावा

बदलापुरात राज ठाकरे कधी येणार?

दरम्यान, आपणही बदलापूरला भेटायला येणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. पण त्या मुलींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आपण भेटणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. “मला तिथे येऊन भेटायचं आहेच. मी २५ तारखेला दौरा पूर्ण करून मुंबईत परत येईन. त्यानंतर मी आलो तर २६ तारखेला बदलापूरला येईन. पण मी एक गोष्ट सांगतो, मी त्यांच्या घरी जाणार नाही, त्यांना भेटणार नाही. त्या गोष्टीचा कुठेही त्या मुलींना, त्यांच्या घरच्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray on badlapur school girl sexual assault case pmw