महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज ( ९ मार्च ) १७ वा वर्धापनदिन. त्यानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. तेव्हा पक्षाची वाटचाल, संदीप देशपांडेंवरील हल्ला, महाराष्ट्रातील राजकारण आणि विविध विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं. त्यावेळी राज ठाकरेंनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे.
संदीप देशपांडेंवरील हल्ल्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “हल्ला झाल्यानंतर मी काही बोललो नाही. मला अनेकांनी विचारलं तुम्हाला काय वाटतं, कोणी केलं? पण, एक निश्चित सांगतो, ज्यांनी हे केलं, त्यांना पहिलं समजेल नंतर बाकीच्यांना. मात्र, माझ्या मुलांचं रक्त वाया जाऊन देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. या फडतूस लोकांसाठी नाही.”
“अख्खी विधानसभा भरली तर काय होईल”
“भरती नंतर ओहोटी आणि ओहोटी नंतर भरती या गोष्टी होत राहतात. भाजपानेही हे लक्षात ठेवावं आज भरती चालू आहे. ओहोटी येऊ शकतं, कारण त्या नैसर्गिक गोष्टी आहेत. कोणी थांबवू शकत नाही. राजू पाटील पक्षाची बाजू विधानसभेत एकटे मांडत आहे. ‘एक ही है लेकीन काफी है’. अख्खी विधानसभा भरली तर काय होईल यांचं,” असेही राज ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा : “…तर मला कुणी घरात घेईल का?”, राज ठाकरेंचा मनसैनिकांना सवाल
“तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं?”
“पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर काढण्याचं काम मनसेनं केलं. तेव्हा बाकीचे हिंदुत्ववादी लोक कुठे होते? काय करत होते? चिंतन! बाकीचे म्हणतात आम्ही हिंदुत्वाला मानतो, म्हणजे काय करता? तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं? नुसती जपमाळ? प्रत्यक्ष कृतीत तर कधी दिसत नाही ते. भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलवलं. विरोध करणारे हिंदुत्ववादीच. मला आतलं राजकारण कळलं होतं. म्हणून मी म्हटलं तूर्तास नको, आत्ता हे राजकारण नको”, असं राज ठाकरे म्हणाले.