लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली, कल्याण, २७ गाव परिसरात पाऊस सुरू झाला की दरवर्षी पडणारे खड्डे आणि त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल विचारात घेऊन शासनाने आता ‘खड्डे आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करावा. या उपक्रमामुळे किमान शासन अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर रहिवासी कसे प्रवास करतात याची जाणीव होईल. हे खड्डे किमान वेळीच बुजविले जातील, अशी मागणी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालया समोरील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हद्दीचा विचार न करता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने ते खड्डे बुजवावेत, असे शासनाचे आदेश आहेत. पेंढरकर महाविद्यालयासमोरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे म्हणून त्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात कल्याण डोंबिवली पालिका टाळाटाळ करत असेल तर ते गंभीर आहे, असे घरत यांनी सांगितले.
हेही वाचा… डोंबिवलीत फेरीवाल्यांचा कचरा रस्त्यावर,सफाई कामगार कचरा उचलून हैराण
राज्यातील सत्ताधीश सत्ता टिकविणे आणि मंत्रीपद मिळते की नाही यामध्ये व्यस्त आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर काय चालले आहे याची जाणीव नाही. शासनाने मोठा गवगवा करुन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम सुरू करुन नागरिकांचा भ्रमनिरास केला आहे. त्याऐवजी ‘खड्डे आपल्या दारी’ हा उपक्रम शासनाने हाती घ्यावा. प्रत्येक शहरांमधील कार्यक्रम निश्चित करुन तेथे पालिका, शासन, एमआयडीसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोलवावेत. त्यांच्या समोरच रस्ता कोणाच्या अखत्यारित आहे याची खात्री करुन त्या कार्यक्रमातच त्या शहरातील खड्डे तात्काळ बुजविले जातील, अशी व्यवस्था शासनाने उभी करावी, अशी मागणी घरत यांनी केली.
चव्हाण यांचा राजीनामा
पेंढरकर महाविद्यालया समोरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. या खात्याचे मंत्री डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत. आपण ज्या शहराचे नेतृत्व करतो. जे खाते सांभाळतो त्याच रस्त्याची डोंबिवलीत दुरवस्था झाली असेल आणि मंत्री म्हणून चव्हाण याविषयी काही करू शकत नसतील, तर त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. नवीन आयात ताफ्यातील एखाद्या आमदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रीपद द्यावे, अशी मागणी घरत यांनी केली.
विकासाच्या आघाडीवर डोंबिवली शहर पूर्ण अपयशी ठरले आहे. शहरातील फेरीवाले कायम आहेत. जागोजागी कचऱ्याचे ढीग, बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट, त्याच्यावर पालिका प्रशासनाचे नियंत्रण नाही. गलिच्छ, घाणेरडे अशी बिरुदे डोंबिवलीसाठी वापरली जात आहेत हे गंभीर आहे, असे घरत म्हणाले.
राज ठाकरे मुख्यमंत्री
कल्याण डोंबिवली शहरांचा काय राज्याचा चेहरा बदलायचा असेल तर पाच वर्ष फक्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हातात राज्याची सत्ता द्या मग पहा विकास कसा असतो ते आम्ही दाखवून देऊ, असा विश्वास घरत यांनी व्यक्त केला. मनसे म्हणून आमची काम करण्याची एक पध्दत आहे. जनतेने आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन घरत यांनी केले.