कल्याण: मुंबई महापालिकेतील विविध विकास कामांच्या चौकशा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस, महालेखापालांकडून सुरू झाल्या आहेत. मागील अनेक वर्ष मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई पालिकेतील घोटाळ्यांचा धागा पकडत कल्याण ग्रामीणचे मनसचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी ठाणे, कल्याण डोंबिवली पालिका हद्दींमधील रस्ते, खड्डे, करोना काळजी केंद्र विषयांवरुनपुन्हा शिवसेनेला ट्वीटव्दारे लक्ष्य केले आहे.
ठाणे पालिका, कल्याण डोंबिवली पालिकेवर अनेक वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरचष्मा आहे. त्यामुळे आ. पाटील यांच्या टीकेचा रोख शिंदे पिता-पुत्राकडे आहे. मुंबई महापालिकेवर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांचे पूर्ण नियंत्रण आहे. शिवसेनेची (उध्दव बाळासाहेब ठाकरे) अनेक वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता आहे. या पालिकेतील विविध प्रकारची विकास कामे, करोना काळातील सुविधा यामध्ये घोटाळा झाल्याचे आरोप करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई पालिकेतील विविध कामांच्या चौकशांचे आदेश दिले आहेत. आगामी पालिका निवडणुकीत मुंबई पालिकेची सत्ता काबीज करण्याची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. शिवसनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अडचणीत आणणे हाही या चौकशांमागील मुख्य उद्देश असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या चौकशांचा धागा पकडून आ. पाटील यांनी मुंबई महापालिका काय ठाणे, कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ‘तेच रस्ते, तेच खड्डे आहेत. फक्त त्यात पुन्हा तोच पाय (ठेकेदार) नेमण्यात आला आहे. जुना माल नवे शिक्के (बांधकामाचे साहित्य निकृष्ट, जुनेच आहे. फक्त कामे देण्याच्या कागदांवर नवीन शिक्के मारले आहेत.) सब घोडे बारा टक्के’ (तिन्ही महापालिकांमध्ये सारखाच टक्केवारीचा कारभार आहे) अशी खोचक टीका ट्विटव्दारे केली आहे.
आ. पाटील गेल्या दोन वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते, विकास कामे, खड्डे, शिळफाटा रस्ता, करोना काळजी केंद्र विषयांवर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, कल्याण लोकसभेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करत आहेत. खा. शिंदे यांच्याकडून आ. पाटील यांना जशाच तसे उत्तर दिले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या प्रमुखपदी विराजमान झाल्यानंतर खा. शिंदे यांच्याकडून आ. पाटील यांना दिलेली विकास कामांवरील प्रत्युत्तरे कमी झाली. त्यानंतर आ. पाटील यांनीही दररोज विकास कामांवरुन पालिका, शासन पदाधिकऱ्यांना लक्ष्य करणारी ट्वीट लिहिण्याचे कमी केले आहे.
हेही वाचा >>> पदवीधर परीक्षा आणि निवडणुका एकाच दिवशी, सरकारने तोडगा काढावा, गोपीचंद पडळकरांची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावत असताना स्तानिक पातळीवर मुख्यमंत्री पुत्र स्थानिक आमदारांशी का ट्वीटर युध्द खेळत आहे, अशीही चर्चा सुरू झाली होती. या चर्चेनंतर आ. प्रमोद पाटील यांनी कितीही आक्रमक ट्वीट केली तर त्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, खा. शिंदे यांच्या जनसंपर्क विभागाकडून ज्या तत्परतेने प्रत्युत्तर दिले जात होते. ते प्रमाण कमी झाले आहे. मध्यंतरी खासदारांची बाजू घेऊन माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, राजेश मोरे तत्परतेने आ. पाटील यांना प्रत्युत्तर देत होते. ते प्रमाणही आता घटले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रकरणी चिरंजीवाला शांत राहण्याचा सल्ला दिला असल्याची चर्चा आहे.
कडोंमपात घोटाळे
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत रस्ते कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांच्या दर्जाविषयी आ. पाटील यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तेच रस्ते आणि ठरावीक ठेकेदारांची मक्तेदारी यामुळे रस्ते दर्जेदार कसे होतील असा आ. राजू पाटील यांचा प्रश्न आहे. करोना काळात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोना काळजी केंद्र उभारणीवरुन अनेक गैरप्रकार झाले आहेत. विभा कंपनीच्या जागेवरील करोना काळजी केंद्राची चौकशीची मागणी आ. पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. एमआयडीसीतील रस्ते, शिळफाटा रस्ता हे चौकशीचे विषय आहेत असे आ. राजू पाटील यांनी ट्वीटमधून सूचित केले आहे.