कल्याण : समाजवादी पक्षाचे आमदार आणि नेते आबू आझमी यांनी ‘छावा’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाची स्तुती करणारे विधान केले आहे. या विधानावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आमदार आबू आझमी यांच्यावर टीका करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. हाच धागा पकडून मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबतची आमदार आझमी यांची छायाचित्रे समाज माध्यमांवर सामायिक करून अगोदर ‘आम्हीच खातो माती…मग त्यांना कशी राहील भीती,’ अशी टीका ट् विटर (एक्स)च्या माध्यमातून केली आहे.
आमदार आबू आझमी यांच्या वक्तव्यावरून राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिंदे, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची जाळपोळ सर्वत्र केली जात आहे. त्यांच्या विरुध्द मोर्चे काढले जात आहेत. काही पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा चित्रपटाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी नेते आबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करणारे विधान केल्याने त्यांचा सर्वत्र निषेध केला जात आहे. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी समाजवादी नेते आबू आझमी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याचा धागा पकडून मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी ‘एक्स’वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजवादी नेते आमदार आबू आझमी यांच्याशी विरंगुळ्याच्या क्षणी कसे हास्य विनोद करत आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मातोश्री बंगल्यात आमदार आबू आझमी यांचे पुष्पगुच्छ देऊन हास्य करत त्यांचे स्वागत करत आहेत, अशी छायाचित्रे प्रसारित केली आहेत.
हा सगळा सत्तेसाठी लांगुलचालनाचा सुरू असलेला प्रकार आहे. अगोदर आम्हीच खातो माती मग कशाला कोणाला राहील भीती, अशा शब्दात माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना एक्सच्या माध्यमातून लक्ष्य केले आहे.