ठाणे – नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना त्वरित सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केली आहे. ठाण्यात शुक्रवारी मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात पाचंगे यांनी यासंदर्भातील निवेदन सादर करुन शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे.
प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, पदवी आणि पदव्युत्तर आदी शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होतो. आर्थिकदृष्ट्या कुटुंब कमकुवत असल्याने अनेक हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाच्यावतीने अशा घटकातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. त्याचप्रकारे, नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमधील तसेच महाविद्यालयातील पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. ही योजना २१ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत २०२४ ते २०२५ च्या शैक्षणिक वर्षात ३६ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात सुमारे २८ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणाचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच धर्तीवर ठाणे महापालिकेनेही विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवावी, असे पाचंगे यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई पालिका शिष्यवृत्ती योजनेचे स्वरुप
नवी मुंबईत या योजनेच्या माध्यमातून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ४ हजार, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ६ हजार, आठवी ते दहावी तसेच तांत्रिक, व्यवसाय प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८ हजार, अकरावी ते बारावीसाठी ९ हजार ६००, महाविद्यालयीन ते पदवी १२ हजार आणि पदवीनंतर १६ हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.
ठाणे महापालिकेने योजनेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी
ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या सर्वच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अशाच स्वरूपाची शिष्यवृत्ती योजना राबवावी, यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी, तसेच विद्यार्थ्यांचे बँक खाते असणे बंधनकारक करून रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याची यंत्रणा विकसित करावी, अशी मागणी संदीप पाचंगे यांनी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या पालकांवरील आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी या योजनेची अंमलबजावणी आवश्यक आहे, असे ही त्यांनी सांगितले.
आपल्या ठाणे पालिका क्षेत्रात असलेल्या शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे,” यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी “लाडका विद्यार्थी” शिष्यवृत्ती योजना राबविणे आवश्यक आहे. – संदीप पाचंगे, सरचिटणीस,मनविसे.