लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: पाच वर्षे उलटूनही अपुर्णावस्थेत असलेल्या घोडबंदर भागातील भुयार गटार योजना प्रकल्पातून अनेक कामे वगळण्यात आल्याने खर्चात कपात होणे अपेक्षित होते. परंतु प्रकल्प खर्चात कपात होण्याऐवजी वाढच झाल्याची बाब पुढे आली असून यामुळे प्रकल्पात ५० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात आले होते. त्यातील घोडबंदर परिसरात भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक चार हा महत्त्वपूर्ण प्रकल्प जानेवारी २०१८ साली हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाच्या अंतर्गत मलटाकी बांधणे, मलवाहिन्या टाकणे, मल केंद्र बांधणे तसेच घरोघरी मलवाहीनी जोडणी करणे अशा कामांचा समावेश होता.

हेही वाचा… राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणले होते प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व; संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांचे प्रतिपादन

अमृत योजनेंतर्गत घोडबंदर भागात राबविण्यात येत असलेला भुयारी गटार योजना प्रकल्प अडीच वर्षात पुर्ण होणे अपेक्षित असतानाही पाच वर्षे उलटूनही प्रकल्पांचे काम अपुर्णावस्थेत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नगरविकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच केंद्र सरकारच्या नियमांना तिलांजलीच वाहली आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी केला आहे. या प्रकल्पामध्ये हिरानंदानी पाटलीपाडा येथे मलनि:सारण केंद्र उभारण्यात आले असून या केंद्राला जाण्यासाठी योग्य रस्ता देखील नसून सध्या मलनि:सारण केंद्र बंद स्थितीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा… मुंब्रा बाह्यवळण मार्गावर दरड कोसळली

या प्रकल्पातील बहुतेक कामांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कात्री लावली. या प्रकल्पात ९२.७५ किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार होत्या. सुधारित मंजुरीमध्ये ६१ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या टाकण्याचे प्रस्तावित करण्यात आले. २९२२ घर जोडण्या करण्यात येणार होत्या. सुधारीत मंजुरीमध्ये ७२८ घर जोडण्यात येणार असून उर्वरित २१९४ जोडण्या वगळ्यात आल्या आहेत. यामुळे प्रकल्प खर्चात ४५ कोटींची बचत होणे अपेक्षित होते. परंतु प्रकल्प खर्चात कपात करण्याऐवजी वाढ करण्यात आली असून १७९ कोटींचा प्रकल्प २२० कोटींवर नेण्यात आला आहे. या प्रकल्पात जवळपास ५० कोटीचा घोटाळा झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा… कल्याणमध्ये गुंतवणूकदारांची ३० लाखांची फसवणूक

या घोटळ्यात महापालिकेचे माजीवाडा मानपाडा मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता मुख्यसूत्रधार असून त्यांना पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घोटाळ्या संदर्भात नगर विकास विभाग तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पत्रव्यवहार केला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव यांनी आयुक्तांना पत्र लिहून संबंधित घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होणे अपेक्षित असून त्यांच्या मालमत्तेची आयकर विभागाच्या माध्यमातून तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns has alleged that there is a scam of 50 crores in the subway sewerage scheme in ghodbunder dvr