लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाण्यातील एम जी या चायनीज ऑटोमोबाईल कंपनीच्या शोरूमला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी काळे फासून आंदोलन केले. मराठीत पाटी नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मराठीत पाट्या करा, नाहीतर मनसेचा खळखट्याक आंदोलनाला सामोरे जा असा इशारा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दुकानदारांना दिला आहे.

शहरातील सर्व दुकानांवरील पाट्या २५ नोव्हेंबर पर्यंत मराठीत कराव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. ही मुदत संपल्यामुळे आणि याबाबत ठाण्यातील बाजारपेठांमध्ये कोणतीच कारवाई झालेली नाही. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी ठाण्यात आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

आणखी वाचा-ठाणे : सिगारेटसाठी पैसे दिले नाही म्हणून तरूणावर वस्ताऱ्याने हल्ला

महिंद्रकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी ठाण्यातील एम जी या चायनीज ऑटोमोबाईल कंपनीच्या शोरूम ला काळे फासून आंदोलन केले. तसेच ठाण्यातील सर्व व्यावसायिक धारकांनी त्यांच्या दुकानावरील पाटी मराठीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. मराठी पाट्या करण्यासंदर्भात प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आली नाही तर मनसेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येईल व त्याची सर्वस्व जवाबदारी ही प्रशासनाची असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. या आंदोलनात मनसेचे दिनकर फुल्सुंदर, मनीष सावंत, हिरा पासी ,कृष्णा देवकोटा व आधी मनसैनिक उपस्थित होते.

दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व दुकानांना तसेच व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनांवरील पाटी मराठी असावी, यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. या आदेशाचे पालन करून घेणे हे स्थानिक महापालिका प्रशासन व कामगार आयुक्त यांचे काम आहे. पण असे असूनही महापालिका व कामगार प्रशासनाच्या वतीने अद्यापही ठाणे महापालिका क्षेत्रातील दुकानांना मराठी पाट्या करण्यासंदर्भात साधी नोटीस देखील बजावण्यात आलेली नाही, असा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns has blackened the showroom in thane and protesting because there is no nameplate in marathi mrj
Show comments