ठाणे: कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच, त्यापाठोपाठ आता मनसेनेही हि निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ठाणे, पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी, मनसे संलग्न संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यात या निवडणूक लढविण्याबाबत चर्चा केल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. या निवडणुकीसाठी किती मतदान नोंदणी करण्यात आली, याचा आढावा घेऊन या निवडणुकीबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याचे सुत्रांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासूनन सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे. आता या निवडणुकीच्या मैदानात मनसेही उतरणार आहे. काही दिवसांपुर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईतील निवासस्थानी बैठक घेऊन त्यात या निवडणुकीबाबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांनी गुरूवारी ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनसेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते अभिजीत पाचंगे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्यासह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा… डोंबिवली जवळील ठाकुर्लीत पारंपारिक पध्दतीने दिवाळी साजरी; आकर्षक पध्दतीने बैलांची सजावट
या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोकण पदवीधर निवडणूक लढविण्याबाबतचा आढावा घेतला. या निवडणुकीसाठी पक्षाकडून किती मतदार नोंदणी करण्यात आली आहे, याचाही आढावा त्यांनी घेतला. ही निवडणूक कशा पध्दतीने लढविली पाहिजे आणि या निवडणुकीत कशाप्रकारे मतदान करण्यात येते. मतदारांना त्या दृष्टीने कसे जागरुक करावे, याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ठाण्यात शिंदेची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप या पक्षांकडून पदवीधर निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असतानाच, आता या निवडणुकीच्या रिंगणात मनसेही उतरणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.