लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे तांडव होत आहे. असे असतानाही महापालिका कळवा रुग्णालयाऐवजी जितो या संस्थेला अधिक महत्व देत आहे. जितो या संस्थेला अशाचपद्धतीने पोसणार असाल तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला.
कळवा येथे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी १७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिका रुग्णालयाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. गुरुवारी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महापालिकेवर गंभीर आरोप केले. कळवा रुग्णालयाची क्षमता वाढविण्याऐवजी केवळ दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. महापालिका जितो या संस्थेला अधिक महत्व देत आहे. साकेत येथे जितो संस्थेला देण्यात आलेल्या जागेवर कर्करोग रुग्णालय सुरु करण्याऐवजी त्याठिकाणी कळवा रुग्णालयाचे विस्तारीकरण केले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जितोला पोसणार असाल तर त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आणखी वाचा-कल्याण जवळील इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ले करणारा अटकेत, ३० हून अधिक गुन्हे दाखल
एखाद्या रुग्णाला बायपास करायची असेल तर जितोच्या हाजुरी येथील रुग्णालयात अडीच लाख रुपयांचा खर्च सांगितला जात आहे. मात्र, कळवा रुग्णालयात अवघ्या सात ते आठ हजारात उपचार होतात. महापालिकेने जितोवर मेहरबानी दाखविली आहे. कर्करोग रुग्णालयासाठी महापालिकेने जितोला इतरत्र जागा द्यावी. कळवा रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या तांडवानंतर याची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. परंतु चौकशी समिती अहवाल का आणि कोणासाठी लांबविला जात आहे. कोणावर कारवाई करायचीच नसेल तर चौकशी समितीची अट्टाहासच का केला असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.
माझ्याविरोधात आता विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊ शकतात. जितो संस्थेविरोधात बोलू लागल्याने गुन्हे दाखल होतील, असा गौप्यस्फोट जाधव यांनी केला आहे.