ठाणे : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर मनसेनेचे नेते अविनाश जाधव यांनी चित्रपटगृहात धाव घेत पुन्हा हा शो सुरू केला होता. दरम्यान, या वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. मनसेने याच मॉलमध्ये सायंकाळी ६:१५ वाजता मोफत शो ठेवला आहे. विवियाना मॉलपासून हाकेच्या अंतरावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निवासस्थान असल्याने राष्ट्रवादी- मनसेचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी रात्री १० वाजताचा हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. तसेच प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढले होते. या घटनेत एका प्रेक्षकाला मारहाणही झाली होती. त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात आले. त्यांनी हा शो पुन्हा सुरू केला. मंगळवारीही विवियाना मॉलमध्ये मनसेने मोफत शो आयोजित केला आहे. मॉल पासून काही अंतरावरच जितेंद्र आव्हाड यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान पोलिसांनी मॉलच्या परिसरात बंदोबस्त वाढविण्यास सुरूवात केली आहे.