लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांनी राजिनामा दिल्याचे म्हटले आहे. अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. परंतु त्यांचा देखील पराभव झाला होता.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष पद आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी निवडणूका लढविल्या होत्या. अविनाश जाधव यांनी सुद्धा ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांचा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी पराभव केला होता. या मतदारसंघात अविनाश जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर होते. ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाला होता. अखेर अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदावरून राजिनामा दिला आहे. राजिनाम्याचे पत्र त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणूकीत ठाणे आणि पालघर येथील पराभवाची जबाबदारी घेऊन मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आहे. काम करताना माझ्याकडू कळत-नकळत काही चूक झाली असल्यास आपण माफ करवावे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.