डोंबिवली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार आपल्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करावा, अशी पत्रे मनसेच्या डोंबिवली शाखेचे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी बुधवारी डोंबिवली शहरातील राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना दिली.

आपल्या दैनंदिन बँक व्यवहारात, ग्राहक संवाद संपर्कात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करावा. मराठी भाषेचा अवमान होणार नाही अशी कोणतीही कृती बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत आणि सहकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांकडे केली.

डोंबिवली शहर परिसरात अनेक बँकांचे कामकाज चालते. काही बँका परराज्यातील आहेत. बहुतांशी बँकांमध्ये हिंदी भाषेतून कामकाजाला प्राधान्य दिले जाते. बँक ग्राहक मराठीतून बोलत असेल तर कर्मचारी, अधिकारी त्यांना आपण हिंदीतून बोला, तुम्ही काय बोलता ते आम्हाला समजत नाही, अशी मागणी करतात. या सगळ्या प्रकारात बँकेत जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, वृध्द नागरिक यांची सर्वाधिक अडचण होत होते. बँकेतील कर्मचाऱ्याशी त्याच्या सूचनेप्रमाणे भाषा बोलली नाहीतर आपले काम होणार नाही या भीतीने कोणी ग्राहक याविषयी उघडपणे बोलत नव्हता.

मुंबईतील दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांंना लक्ष्य करून या बँकांमधील कारभार पहिले मराठी झाल पाहिजे. तसे ते करत नसतील तर त्यांना मनसे पध्दतीने सांगा, असा सूचक इशारा दिला होता. पक्षाध्यक्षांच्या या आदेशाची दोन दिवसापूर्वी ठाण्यातून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी बँकेत जाऊन सुरूवात केली. त्यानंतर मनसे पदाधिकारी शहरातील विविध आस्थापनांमध्ये जाऊन मराठीतून कारभार करा म्हणून सूचना देऊ लागले आहेत.

या आदेशाप्रमाणे मनसेचे डोंबिवली शहरप्रमुख राहुल कामत यांनी उप शहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे, राजू पाटील, किशोर कोशीमकर, दीपक शिंदे, सचिव उदय वेळासकर, विभाग अध्यक्ष रतिकेश गवळी, समीर भोर, धनराज तांबुसकर, राकेश अर्कशी, साहिल तिवारी, देवेश बटवाल यांच्यासह डोंबिवलीतील प्रमुख राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बँकांमध्ये जाऊन पत्रे दिली. आपल्या बँक व्यवहारातील कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करावा. बँकेच्या सूचना फलकावरील सूचना पत्रे, निवेदने मराठीतून प्रसिध्द करावीत. ग्राहकांशी मराठीतून संवाद साधावा. या सर्व सूचनांचे पालन करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केली आहे.या सूचनांचे अवलंब करण्याचे आश्वासन बँक अधिकाऱ्यांनी शहरप्रमुख कामत यांना दिले.

पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे डोंबिवलीतील सर्व प्रमुख बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना भेटून बँकेतील दैनंदिन कामकाज मराठीतून करावे. ग्राहकांशी मराठीतून संवाद साधावा याविषयी पत्रे दिली आहेत. बँकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. – राहुल कामतशहर अध्यक्ष, मनसे, डोंबिवली