ठाणे – एकीकडे जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रम राबविले जात असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला विभागाने ठाण्यात अनोखे आंदोलन करत महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आंदोलन करत आम्हाला पंधराशे रुपये नको, रोजगारासह सुरक्षेची हमी द्या, अशी मागणी केली.
८ मार्च रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुढे येत असून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मनसेने आंदोलन करत हाच मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेच्या महिला विभागाच्या ठाणे शहराध्यक्ष समीक्षा मार्कंडे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्थानक परिसरात आंदोलन करण्यात आले. ‘३६५ दिवस महिला दिन साजरा हवा’, ‘तिला बंधन नको, तिला स्वातंत्र्य हवे’, ‘अशा नराधमांसाठी कायदा आमच्या हातात द्या’ अशा विविध आशयांचे फलक घेऊन मनसेच्या महिला कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सरकारने महिलांच्या खात्यात पंधराशे रूपये जमा करून महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला. पण त्या बदल्यात महागाई वाढवली आहे. सामान्य महिलांचे जगणे कठीण झाले आहे. घरातील खर्च किती असावा, हे ठरवण्याची ताकद महिलांमध्ये आहे. पंधराशे रुपये आम्हाला नकोत, महिलांना रोजगार आणि सुरक्षिततेची हमी द्या, अशी मागणी समीक्षा मार्कंडे यांनी केली. महिलांनी सक्षम होण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला हव्यात. रोजचा दिवस हा महिलांचा आहे. जर महिला घर सांभाळू शकते तर, हा देश पण सांभाळू शकते आणि महिला आहेत म्हणून सगळे आहेत. प्रत्येक महिलेला स्वाभिमान आहे, तोच हक्क आहे, तुम्ही तुमच्यासाठी लढा, तुमचा हक्क तुम्ही मागा असेही त्या म्हणाल्या.