डोंबिवली : यापूर्वी शिवसेना-भाजप युतीला जनतेने राज्य सत्तेसाठी जनादेश दिला होता. त्याचे पालन न करता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याच्या विपरित भूमिका घेतली. अन्य पक्षांबरोबर घरोबा करुन सत्ता काबीज केली. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यापेक्षा भीतीच अधिक वाटते, असे मत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनसेची युती होणार का, अशा चर्चा रंगली होती. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आ. पाटील माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्य सत्ता, युती, आघाडी विषयी विविध अंदाज बांधले जात आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडचणीत आहेत म्हणून मनसे म्हणून आम्ही त्यांना का मदत करायची. मराठी माणसाच्या मनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे असे लाख वाटत असले तरी आमच्या मनात पण त्याविषयीची ठासून ओढ असली पाहिजे. लोकांची कितीही इच्छा असली तरी अशाप्रकारे युती होणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या बरोबर अशा परिस्थितीत तर अजिबात युती करू नये, असे आपले नेता म्हणून नव्हे तर एक सामान्य मनसैनिक म्हणून इच्छा आहे, असे आ. पाटील म्हणाले. मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे अडचणीत होते. काही पारिवारिक प्रश्न निर्माण झाले होते. अशा अटीतटीच्या काळात साथसंगत सोडाच, पण मनसेचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी चोरुन नेले. मग, अशा माणसांबरोबर कशासाठी युती करायची. ते अडचणीत आहेत म्हणून आपण हात पुढे करायचा त्याची गरजच वाटत नाही, असे आ. पाटील म्हणाले.

हेही वाचा >>>ठाकुर्लीत मांजराला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन फेकल्याने मृत्यू

यापूर्वी यांनी शिवसेना-भाजप युतीमधून निवडणुका लढविल्या. कोठेतरी बिनसले म्हणून उद्धव ठाकरे यांनी जनादेशाच्या विरोधात भूमिका घेऊन भलत्याच पक्षांबरोबर घरोबा केला. हे लोकांना पटले नाही. त्यामुळे त्यानंतर जे घडले त्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोष देण्यात अर्थ नाही. लोकांनी दिलेल्या मतांच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्याचे भोग आता भोगावे लागत आहेत, अशी टिपणी आ. पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून केली.शिवसेना नेते संजय राऊत, अभिजित पानसे हे पूर्वीपासुनचे मित्र आहेत. काही विकास कामांसंदर्भात त्यांची भेट होऊ शकते. ही भेट युतीचीच होती असे म्हणणे बरोबर नाही. युती सोडून अन्य विषयावर ते चर्चा करू शकतात, अशी स्पष्टोक्ती आ. पाटील यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mla pramod patil statement that fear is more than alliance with uddhav thackeray amy
Show comments