महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी नागरिकांच्या समस्यांवरून आता राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदरांनी बंडखोरी केल्याने राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपा मिळून नवीन सरकार सत्तेवर आलं. याला आता जवळपास दीड महिना होत आला आहे. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायम टीका सुरू आहे. आता मनेसचे आमदार प्रमोद पाटील यांनी देखील या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
“बंड झाले, आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल?” असं आमदार पाटील यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
ठाण्यातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्ड्यांसह विविध समस्यांवरून आमदार पाटील यांनी टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून या समस्यांमुळे नागरिक प्रचंड हैराण आहेत. शिवाय, पावसाळा असल्याने रोगराईचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. यामुळे लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जबाबदार मंत्री, नगरसेवकांची आवश्यकता आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील कारभारावर आपल्या ट्विटच्या माध्यमातून टिकेची झोड उठवून नागरी प्रश्नांकडे लक्ष वेधणारे मनसेचे कल्याण ग्रामीण विभागाचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर थोडे ‘शांत’ होते. कल्याण डोंबिवली विभागात नागरी समस्यांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे विरुध्द आ. प्रमोद पाटील यांच्यात पत्रक, फलकबाजी, ट्विटरच्या माध्यमातून सतत खडाखडी सुरू होती.
या खडाखडीला आ. पाटील यांनी आज (सोमवार) पुन्हा सुरुवात केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. जिल्ह्यात पालकमंत्री नाही. प्रशासनावर कोणाचा वचक राहिलेला नाही. पालिकांमध्ये नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे’ अशा विषयांवरुन आ. पाटील यांनी राज्याच्या कारभाऱ्यांवर ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे.
मंत्रिपद देण्याची चर्चा –
राज्यसभा, विधान परिषद खासदार, आमदार निवडीच्यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे मनसेचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी भाजप खासदार, आमदारांना समर्थन दिले. या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी झाल्या. राज्यात सत्ताबदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तापदी विराजमान झाले. भाजपला मतदान, सत्ता बदलात बहुमतासाठी मनसेने मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांना मोलाची मदत केली. मनसे आमदाराला मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता मनसेची राज्य सरकार विरुध्द आक्रमक भूमिका दिसणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. तसेच चित्र गेल्या महिन्यापासून दिसत होते.
नेहमी राज्य सरकारच्या भूमिकेवर, ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्यांच्या माध्यमातून स्थानिक, प्रशासन, खासदारांचे डोळे उघडणारे आ. प्रमोद पाटील थोडे शांत झाल्याची चर्चा सुरू असतानाच, आ. पाटील यांनी आज ट्वीट करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकार प्रमुखांचा थेट उल्लेख न करता, मंत्रिमंडळ स्थापन नसल्याने निर्माण झालेल्या प्रशासकीय समस्या, लोकांचे होणार हाल याकडे ट्विटच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. शिवसेनेत बंड होऊन राज्यात सत्ता बदल झाला. मोठमोठी विकासाची आश्वासने लोकांना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना देण्यात आली. ते सर्व आता थंड झाले का, असा चिमटा आ. पाटील यांनी नामोल्लेख टाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेतला आहे.
दीड महिन्यापासून राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने समाज माध्यमांत विविध प्रकारची चर्चा, उपरोधिक टीका सुरू झाली आहे. त्यात आता सत्तेचे समर्थक असुनही आणि मंत्रीपद मिळण्याची शक्यता असताना पुढे काय होईल याची पर्वा न करता मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी उडी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.