डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव उल्हास खाडी किनार माघार पाणलोट (बॅक वाॅटर) भागात मातीचा भराव टाकून कल्याण डोंबिवली पालिकेकडून निसर्ग उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना खाडी किनारची जैवविविधता नष्ट केली जात आहे, अशी तक्रार मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी महसूल विभागाकडे केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन कल्याणच्या तहसीलदारांनी या भराव प्रकरणाची चौकशी करून सविस्तर अहवाल दाखल करण्याचे आदेश डोंबिवलीच्या मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील जैवविविधतेने बहरलेल्या मोठागाव खाडीकिनारी भागात महसूल, पालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संगनमत करून काहींनी दिवसाढवळ्या खारफुटीची झाडे तोडून मातीचा भराव टाकण्यास सुरूवात केली आहे. कोपर, मोठागाव, देवीचापाडा, गणेशनगर हा एकमेव हरीतपट्टा डोंबिवलीत शिल्लक आहे. पर्यावरण अभ्यासक, निसर्ग छायाचित्रकार या भागात बाराही महिने जैवविविधतेच्या अभ्यासासाठी, छायाचित्रणासाठी येतात. असे असताना डोंबिवतील महत्वाचा हरित भाग भराव टाकून नष्ट केला जात आहे. पालिका, शासन अधिकाऱ्यांचे या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष नसल्याने आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा… कल्याण-डोंबिवली पालिकेतील दहा अधिकारी चौकशी रडारवर
मोठागाव भागात उल्हास खाडी किनार भागात निसर्ग उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी शासनाच्या पर्यावरण विभागाकडून सहा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि आपण स्वता प्रयत्न करून हा निधी मंजूर करून आणला आहे. जैवविविधतेला हात न लावता मोठागावखाडीच्या माघार पाणलोट भागात निसर्ग संवर्धन, खाडी किनारा विकास, पक्षी निरीक्षण मनोरा, बगिचा, नौका विहार, तलाव विकास, चालण्यासाठी पायवाट असे उपक्रम या निधीतून राबविले जाणार आहेत, असे शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी समाज माध्यमांवरील माहितीत म्हटले आहे. काही मंडळी हेतुपुरस्सर या कामाविषयी खोटी माहिती पसरवित असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
पालिकेची भूमिका
पर्यावरण विभागाच्या मंजुरीने मोठागाव खाडी किनारी भागात कामे केली जात आहेत. या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे. जूनमध्ये या कामासाठी ९९ लाखाचा निधी मंजूर होऊन हे काम डोंबिवलीतील देवी चौकातील मे. केम सर्व्हिसेस एजन्सीला देण्यात आले आहे, असे पालिकेने म्हटले आहे.
“ मोठागाव खाडीकिनारी सुरू असलेल्या माती भराव टाकण्याच्या कामाची माहिती घेऊन सविस्तर अहवाल देण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. अहवाल आल्यानंतर त्यात काही त्रृटी आढळल्या तर योग्य कार्यवाहीचा निर्णय घेतला जाईल.” – जयराज देशमुख, तहसीलदार, कल्याण.
“ शासनाच्या पर्यावरण विभागाचा निसर्ग संवर्धनाचा हा प्रकल्प आहे. आवश्यक परवानग्या घेऊन हा प्रकल्प सूरू केला आहे. यामध्ये पर्यावरणाची कोणतीही हानी केली जाणार नाही. ” – अर्जुन अहिरे, शहर अभियंता, कडोंमपा.