कल्याण- कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात शनिवारी रात्री एका महिलेची प्रसूती झाली. रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांनी तत्परता दाखवली असती तर हा प्रकार टळला असता, अशी टीका करत मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे डॉक्टर असुनही लोकांची नस पकडण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका रविवारी केली.
पालिका प्रशासनासह शहराला लाज आणणारी ही घटना आहे. पालिकेची एवढी सुसज्ज यंत्रणा, मनुष्यबळ असताना एक महिला पालिका रुग्णालयाच्या दारात रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रसूत होते याविषयी चीड आमदारांनी व्यक्त केली. आ. पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. दांगडे, खा. डॉ. शिंदे यांना लक्ष्य केले. या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाला जबाबदार डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे यासाठी आपण या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आग्रही राहणार आहोत. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर मनसे पध्दतीने पालिका प्रशासनाला जाब विचारला जाईल, असा इशारा आ. पाटील यांनी दिला.
हेही वाचा >>> Maratha Reservation : ठाण्यात कडकडीत बंद; दुकानदारांचा पाठिंबा, वाहतुकीची स्थिती काय?
शनिवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकाजवळील स्कायवाॅकवर राहत असलेली एक फिरस्ता महिला प्रसूती वेदनांनी हैराण असल्याची माहिती गस्तीवरील पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ या महिलेला रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले. रुग्णालाच्या प्रवेशव्दारावर तेथील कर्मचारी, डाॅक्टरांनी आमच्याकडे कर्मचारी नाहीत. तुम्ही दुसरीकडे या महिलेला दाखल करा, अशी उत्तरे पोलिसांना दिली. महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्याने आणि पालिका रुग्णालयातील कर्मचारी असहकार्य करत असल्याने पोलिसांनी वरिष्ठांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. या कालावधीत महिलेची रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात प्रसूती झाली. या सगळ्या घटनेमुळे उपस्थित पोलीस आणि या महिलेच्या साहाय्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
हेही वाचा >>> ठाण्यात तीन डब्यांची मेट्रो; केंद्र सरकारची महापालिकेला सूचना
हा प्रकार समजताच मनसेचे पदाधिकारी रुग्णालयात दाखल झाले. घडल्याप्रकारा बद्दल तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली. रुग्णालय प्रशासनाने मात्र रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती विभाग वसंती व्हॅली भागात स्थलांतरीत केला आहे. त्याठिकाणी या महिलेला नेण्याची व्यवस्था रुग्णालयाकडून केली जात जात होती. रुग्णवाहिका प्रवेशव्दारात उभी होती. या कालावधीत महिलेची प्रसूती झाली. प्रसूतीनंतर रुक्मिणीबाई रुग्णालयातच या महिलेची डाॅक्टर, परिचारिकांनी शुश्रूषा केली. बाळ, त्याच्या आईला आवश्यक वैद्यकीय उपचार तात्काळ दिले. दोघेही सुखरुप राहतील याची काळजी घेतली, असे स्पष्ट केले. आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आवश्यक शस्त्रक्रिया या भव्य वास्तुंच्या रुग्णालयात केल्या जात नाहीत. कर्मचारी वर्ग फक्त निविदा, कोट्यवधीची औषध खरेदी, सोनोग्राफी यंत्रणा खरेदी आणि त्याची देखभाल दुरुस्ती या विषयात दंग असल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेला वैद्यकीय सेवेत अंशकालीन काळात साहाय्य करणारे काही खासगी तज्ज्ञ डॉक्टर पालिका डॉक्टरांच्या त्रासाला कंटाळून सोडून गेल्याची चर्चा आहे. काही जणांचे वैद्यकीय सेवेचे देयक रोखून धरण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.