मागील दोन वर्ष कल्याण ग्रामीण, डोंबिवलीतील रस्ते कामांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना पत्रव्यवहार, समाज माध्यम, फलकांच्याव्दारे सतत लक्ष्य करणाऱ्या कल्याण ग्रामीणचे मनसे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी शनिवारी डोंबिवलीत शहराच्या विविध भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रस्ते कामांचा प्रारंभ केल्याने आभाराचे फलक लावले आहेत. हे फलक चर्चेचा विषय झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ४४५ कोटी रस्ते कामांचा भूमिपूजन कार्यक्रम ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातर्फे रविवारी डोंबिवलीत होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निधी आणून फक्त त्याच्या घोषणा केल्या जातात. फलक लावले जातात. प्रत्यक्षात रस्ते कामे मार्गी लावली जात नाहीत. कधी निधी आला.निविदा झाल्या मग कामे कधी होणार कल्याण ग्रामीण, डोंबिवलीतील रस्ते कामे, असे प्रश्न आ. पाटील यांच्याकडून ट्वीटर, पत्रांच्या माध्यमातून उपस्थित केले जात होते. त्याला शिंदे समर्थकांकडून जशाच तसे उत्तर दिले जात होते.’आता जशी मी तुमच्यावर रस्ते कामांवरुन टीका करतो, तशी तुम्ही कामे सुरू करा, तुमच्या अभिनंदनाचेही फलक मी विनाविलंब लावीन,’ असे जाहीरपणे आ. पाटील यांनी फेब्रुवारीमध्ये डोंबिवली एमआयडीसीतील रस्ते भूमिपूजन कार्यक्रमात तत्कालीन नगरविकास मंत्री, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सांगितले होते.

हेही वाचा : ठाणे, कळवातील पुलांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, विकासकामांवरुन श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हे

विकास कामांचे भूमिपूजन होऊनही अनेक महिने प्रत्यक्षात रस्ते कामे सुरू न झाल्याने आ. प्रमोद पाटील यांनी रस्ते कामे कधी सुरू होणार. लवकर कामे सुरू करा असे फलक डोंबिवलीत लावले होते. नंतर हेच फलक उलटे करुन ठेवण्यात आले होते. कामे सुरू झाली की हे फलक आम्ही काढू टाकू, असे त्यांनी जाहीर केले होते. अनेक महिने हे फलक युध्द सुरू होते. रविवारी डोंबिवलीत रस्ते कामांचा भूमिपूजन कार्यक्रम होत असल्याने समाधान व्यक्त करत आ. प्रमोद पाटील यांनी फेब्रुवारी मध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे फलक न संकोचता लावले आहेत.

हेही वाचा : विश्लेषण: जितेंद्र आव्हाड आणि वाद हे समीकरण नेमके काय आहे?

या फलकांची शहर परिसरात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आ. पाटील विकास कामांवरुन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष, खा. शिंदे यांना ट्वीटर समाज माध्यमातून लक्ष्य करत आहेत. परंतु त्याला आक्रमकपणे उत्तर देण्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने थांबविले आहे. ही उत्तरे आता डोंबिवलीतून खासदार शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे, राजेश मोरे देण्याचा प्रयत्न करत आहेत.आगामी निवडणुका विचारात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक वाढल्याने त्याचे हे फलक म्हणजे सुपरिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mla raju patil put up plaque thanking cm eknath shinde as road works started kalyan dombivali tmb 01