राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची शुक्रवारी कल्याण येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना रोहित पवार यांनी दावा केला की, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे आगामी निवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढतील. आमदार रोहित पवारांच्या दाव्यावर कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार राजू पाटील म्हणाले, रोहित पवार यांचा तर्क बरोबर असू शकतो. मित्रपक्षाचं बळ कमी करणं हे भाजपाचं धोरण नेहमीच राहिलं आहे.
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले, कल्याण लोकसभेची जागा पूर्वीपासून भाजपाचीच होती. परंतु, तेव्हा भाजपाचं या मतदारसंघात फार काही चालत नव्हतं. त्यामुळे शिवसेना नेते आनंद दिघे यांनी ही जागा भाजपाकडून खेचून घेतली. परंतु, आता इथे (कल्याणमध्ये) भाजपा वरचढ होताना दिसतेय. त्यामुळे भाजपावाले ही संधी सोडतील असं वाटत नाही.
आमदार राजू पाटील म्हणाले, भाजपाची एक पद्धत राहिली आहे. जसं की आमदार रोहित पवार म्हणाले, भाजपा नेहमीच समोरच्या पक्षाचं नुकसान करण्याचा, त्या पक्षाला दाबण्याचा प्रयत्न करते. रोहित पवार यांचं म्हणणं (कल्याण लोकसभेची जागा भाजपाच्या चिन्हावर लढवली जाऊ शकते) रास्त आहे. त्या अनुषंगाने तुम्ही इथल्या वाटचाली बघा. कल्याण लोकसभेची वाटचाल ही भाजपा उमेदवाराच्या दिशेने सुरू आहे.
हे ही वाचा >> भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला द्वीपक्षीय करारांची चिंता; संरक्षणमंत्री म्हणतात; “जर आरोप सिद्ध झाले…!”
राजू पाटील म्हणाले, रोहित पवार यांना राजकीय वारसा आहे. त्यांच्या घरात चर्चा सुरू असतील. त्यातून त्यांना टीप मिळाली असेल. माझं त्यांच्या एका वाक्याला समर्थन आहे की कल्याण लोकसभेची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे. कारण सध्या या मतदारसंघाची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे. इथे सुरू असलेल्या वाटाघाटींवरू तसं दिसतंय.