ठाणे : मराठीत बोलणार नाही, काय करायचे असेल ते करून घ्या, अशी भाषा ठाण्याच्या कोपरी भागातील एका बँकेच्या महिला अधिकाऱ्याने वापरल्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी राज्यातील कायद्याची आठवण करून देत या अधिकाऱ्याला चांगलाच हिसका दाखविला. यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्याच्या केबीनमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर संबंधित अधिकाऱ्याने माफी मागिल्याचा दावा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिलेल्या आदेशानंतर ठाण्यातील बँकेमध्ये तसेच आस्थापनांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही, याची पाहणी पक्ष कार्यकर्त्यांनी सुरू केली असून त्यात मराठीचा वापर होत नसलेल्या ठिकाणी मनसेने आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. अशाचप्रकारे ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून बँकांना पत्र देऊन त्यात राज्यातील कायद्यानुसार मराठीचा वापर करण्याची सुचना केली जात आहे. तसेच ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नाही अशा ठिकाणी आंदोलन करण्यास सुरूवात झाली आहे.
दरम्यान, मनसेच्या महिला ठाणे शहराध्यक्ष समिक्षा मार्कंडे, मनसेचे ठाणे उपशहराध्यक्ष मनोहर चव्हाण, विभागप्रमुख संदीप साळुंखे, राजेश बागवे, पप्पु कदम या सह कार्यकर्ते कोपरी भागातील एसबीआय बँकेच्या शाखेत पत्र देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी बँकेच्या महिला अधिकारीला पत्र देऊन मराठीचा वापर बँकेच्या दैनंदिन व्यवहारात करण्याची मागणी केली. मात्र, त्या अधिकाऱ्यांनी इतके जण कार्यालयात कसे आले, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मराठीत बोलणार नाही, काय करायचे असेल ते करून घ्या, अशी भाषा वापरली. यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्या महिला अधिकारीला धारेवर धरले.
महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन आदेशाचा अनुषंगाने महाराष्ट्रात असलेल्या शासकीय, निमशासकीय व इतर शासन संचालित अस्थापनांना आपल्या दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर प्रामुख्याने करणे अनिवार्य केले आहे. या आदेशाची आठवण करून देत दुसऱ्या राज्यातून इथे पैसे कमविण्यासाठी येता मग, इथली भाषा शिकण्यात आणि ती बोलायला काय अडचण आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्याच्या केबीनमध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. या संदर्भात मनसेच्या महिला ठाणे शहराध्यक्ष समिक्षा मार्कंडे यांच्याशी संपर्क साधला असता, कोपरी भागातील एसबीआय बँकेच्या शाखेतील महिला अधिकारीला पत्र देऊन मराठीचा वापर बँकेच्या दैनंदिन व्यवहारात करण्याची मागणी केली. त्यावर तिने मराठीत बोलणार नाही, काय करायचे असेल ते करून घ्या, अशी भाषा वापरली. यामुळे त्यांना राज्यातील कायद्याची आठवण करून देत हिसका दाखविताच त्यांनी माफी मागितली, असे त्यांनी सांगितले.