लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलनाक्यावरील प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेने बुधवारी आंदोलन केले. प्रस्तावित टोल दरवाढ रद्द केली नाहीतर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेने यावेळी दिला. या आंदोलनामुळे मुलुंड टोलनाका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर नवघर पोलिसांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंदनगर भागात टोलनाका आहे. काही वर्षांपूर्वीच राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला हस्तांतरित केला आहे. परंतु एमएसआरडीसीच्या माध्यमातून टोलकंपनी मार्फत टोलवसूली करीत आहे. २०२३ पर्यंत मुंबई प्रवेशद्वारावरील टोल नाक्यावरून सुमारे ४० हजार कोटी रुपाची टोल वसूल करण्यात आल्याचा दावा मनसेने केला आहे. हा टोल नाका बंद व्हावा यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले.
हेही वाचा… डोंबिवली नागरी सहकारी बँकेत भुरट्याकडून ग्राहकाची फसवणूक
तसेच येत्या १ ऑक्टोबरपासून टोल दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. ही दर वाढ त्वरित रद्द करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. येत्या १५ दिवसात प्रस्तावित दरवाढ रद्द केली नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल आणि त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशारा टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवदेनाद्वारे यावेळी देण्यात आला. त्यानंतर मुलुंड येथील नवघर पोलसांनी अविनाश जाधव यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या घटनेचा मनसेने निषेध व्यक्त केला.