ठाणे : ठाणे महापालिकेने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठसाठी भुखंडाचा वापर शिक्षणाच्या उद्देशाने होण्याऐवजी कपडे आणि घरगुती वस्तूंच्या प्रदर्शनासाठी केला जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. याप्रकरणी त्यांनी कारवाईची मागणीही पालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात येत नसल्यामुळे मनसेने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून भूखंडाच्या परिसरात बुधवारी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने पोखरण क्रमांक २, हिरानंदानीजवळील निहारिका संकुलाजवळ असलेला भूखंड यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला भाडेतत्त्वावर दिला आहे.

ठाणे शहरात विद्यापीठाचे केंद्र नसल्याने, स्थानिक विद्यार्थ्यांना मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासू नये, या उद्देशातून हा भुखंड देण्यात आला होता. या भूखंडावर विद्यापीठाची स्थापना करून ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा हेतू होता. परंतु गेल्या दहा वर्षांपासून हा भूखंड मोकळा असून त्याचा वापर व्यवसायिक कारणांसाठी केला जात आहे. या भूखंडावर विद्यापीठाऐवजी कपडे आणि घरगुती वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

हे प्रदर्शन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तात्पुरते बांधकामही करण्यात आले आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला होता. याबाबत त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले होते. त्यात संबंधित संस्थेला विद्यापीठ स्थापन करता येत नसेल तर हा भूखंड महापालिकेच्या वतीने विद्यापीठाच्या संस्थेकडून परत घेण्यात यावा आणि भूखंडधारकावर बेकायदेशीर प्रदर्शन भरवल्या संदर्भात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

परंतु त्याची दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप करत मनसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ साठी आरक्षित असलेल्या भूखंडाच्या परिसरात ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच भूखंड त्वरित अतिक्रमण मुक्त करण्यात आला नाही तर या विषयासंदर्भात शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने यावेळी दिला.

Story img Loader