ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिलेल्या आदेशानंतर ठाण्यातील बँकेमध्ये तसेच आस्थापनांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही, याची पाहणी पक्ष कार्यकर्त्यांनी सुरू केली असून त्यात मराठीचा वापर होत नसलेल्या ठिकाणी मनसेने आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. अशाचप्रकारे गुरूवारी मनसेने शहरात विविध ठिकाणी आंदोलने केली. यावेळी मराठीत बोला नाहीतर धडा शिकवू असा इशारा त्यांनी बँका तसेच आस्थापनांच्या अधिकाऱ्यांना दिला. त्याचप्रमाणे टपाल विभागालाही दणका देत शासनाने दिलेल्या आदेशाची आठवण करून दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिलेल्या आदेशानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांकडून आंदोलने सुरू झाली आहेत. अशाचप्रकारे ठाण्यातही मनसेकडून आंदोलने सुरू झाली आहेत. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन आदेशाचा अनुषंगाने महाराष्ट्रात असलेल्या शासकीय, निमशासकीय व इतर शासन संचालित अस्थापनांना आपल्या दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर प्रामुख्याने करणे अनिवार्य केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची पाहाणी मनसे कार्यकर्त्यांनी सुरू केली असून त्यामध्ये ज्या बँका तसेच आस्थापनांमध्ये मराठीचा वापर होत नाही किंवा तेथील अधिकारी आणि कर्मचारी मराठीत बोलत नाहीत. त्याठिकाणी मनसेकडून आंदोलने करण्यात येत आहेत. अशाचप्रकारे भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागात मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी गुरुवारी आंदोलन केले.

या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना शासनाने दिलेल्या आदेशाची आठवण करून देत स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका महाराष्ट्रात मराठीचा वापर करा असा संदेश असलेली प्रतिमा भेट दिली. येत्या पंधरा दिवसात सदर टपाल विभागातील व्यवहार मराठी भाषेत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. तसेच शहरातील केंद्रशासन संचालित विविध आस्थापना यांच्या मध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने करावा आणि तसे केले नाहीतर संबंधित आस्थापनां चालकांना धडा शिकवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.