डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील पलावा पूल होणार कधी, असे प्रश्न करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांना समाज माध्यमांतून लक्ष्य करणारे माजी आमदार राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एप्रिल फुलचे निमित्त साधून मंगळवारी लक्ष्य केले.
पलावा पुलाचे काम शिंदे पिता-पुत्रांमुळेच रखडल्याचा माजी आमदार राजू पाटील यांचा पहिल्यापासून रोख आहे. मंगळवारी एप्रिल फुलचे निमित्त साधत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पलावा पुलाचे उद्घाटन ३१ एप्रिलला होणार. या पुलाच्या उद्घाटनासाठी हास्यविनोदवीर कुणाल कामरा येणार अशी कोपरखळी मारत शिंदे पिता पुत्रांना समाज माध्यमांतून लक्ष्य केले.
तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल झालेला पलावा पूल कधी होणार. हा पूल बनत होता, बनत आहे, बनतच राहील का, असे प्रश्न राजू पाटील यांनी कामराच्या गीताच्या चालीवर उपस्थित केले होते.
नेहमीच आपली निवेदने, पत्रे देऊन एमएमआरडीए, शासनाकडे दाद मागणाऱ्या राजू पाटील यांना पलावा पुलासाठी मंगळवारी एप्रिल फुलचा दिवस निवडला. या दिवसाचे गमतीचे औचित्य साधून गमतीत चिमटे काढत शिंदे यांना लक्ष्य केले. आपल्या दोन्ही नेत्यांना पलावा पुलावरून लक्ष्य केल्याने शिंदे शिवसेनेत सकाळपासून चुळबूळ सुरू होती. खासदार शिंदे, राजू पाटील यांच्यातील राजकीय धुसफुसीमुळेच पलावा पूल रखडल्याची जोरदार चर्चा मागील दोन वर्षापासून आहे. खासगीत अधिकारी वर्ग हा प्रकार मान्य करतात.
मोरे मैदानात
आपल्या नेत्यावर टीका झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार शिंदे समर्थक आमदार राजेश मोरे यांनी समाज माध्यमांतून थेट राजू पाटील यांना लक्ष्य केले. राजू पाटील यांच्यावर नामोल्लेख टाळुन टीका न करता आमदार मोरे यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटने राजू पाटील यांची आमदार पदी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिल रोजीच हा आमदारकीचा शपथ विधी सोहळा उरकण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी जगभरातून राष्ट्राध्यक्ष कल्याण येथे येणार आहेत. हा शपथ विधी सोहळा समाज माध्यमांतील प्रतिमेतील उजव्या कोपऱ्यातील एप्रिल फूल जागेत होणार आहे, असे आमदार मोरे यांनी समाज माध्यमांतील आपल्या मजकुरात म्हटले आहे.
आमदार मोरे यांचा हा मजकुर शिवसैनिकांनी जोरदार सामायिक करण्यास सुरूवात केली आहे. तर मनसे सैनिकांनी पलावा पुलाचा राजू पाटील यांचा मजकूर समाज माध्यमांत प्रसारित करून शिवसेनेला तोडीस देण्याचा प्रयत्न सुरू केला. या राजकीय व्दंदात प्रवासी मात्र दीनवाणे होऊन पहिले पलावा पूल सुरू करा हो, अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांत देत आहेत.