ठाणे : मशीदींवरील भोंगे ३ मे पर्यंत राज्य सरकारने उतरवावे अन्यथा मशीदींसमोर ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर मनसेचे ठाणे जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा- कौसा येथील महत्त्वाच्या जामा मशीदीसमोर सकाळी ६, दुपारी १, सायंकाळी ५ आणि रात्री ८ यावेळेत ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावण्यासाठी ठाणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे मुंब्रा येथील काही मुस्लिम धर्मगुरुंनी मुंब्रा शहरातील नागरिकांनी शांतता पाळावी असे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात मशीदींवरील भोंग्यावरून संपूर्ण राज्याचे राजकारण तापले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशीदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मशीदींसमोर ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ३ मे ला कौसा येथील जामा मशीदीसमोर ध्वनीक्षेपक लावण्यास परवानगी मागितली आहे. त्यासाठी त्यांनी मुंब्रा पोलिसांना ई-मेलद्वारे पत्र पाठविले आहे. सकाळी ६, दुपारी १, सायंकाळी ५ आणि रात्री ८ या कालावधीत या ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावण्याची परवानी मिळावी असे त्यात म्हटले आहे. या पत्रामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.