ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्यानंतर आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. मात्र काही वेळानंतर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा राष्ट्रवादीने बंद पाडलेला शो पुन्हा सुरु केला. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही ट्वीटरवरुन या प्रकारावरुन संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली विवीयाना मॉलमध्ये आंदोलन करण्यात आले. यामुळे सिनेमागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला होता.

या गोंधळानंतर अमेय खोपकर यांनी, “अफझल खानचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब यांचे इतिहासाचे ज्ञान…” असं म्हणत आव्हाड यांना खोचक टोला लगावला आहे. “हे महाराजांचा इतिहास खरा काय आणि खोटा काय ते सांगत आहेत,” असं म्हणत अमेय खोपकर यांनी घडलेल्या प्रकारावरुन नाराजी व्यक्त करत टोला लगावला आहे.

“अफझल खान हा जर आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आला होता तर त्याने तुळजापूर येथील मंदिरावर हल्ला का केला?” असा प्रश्नही खोपकर यांनी ट्वीटरवरुन विचारला आहे.

“शो बंद पडताय मग आमचे पैसे परत द्या अशी मागणी करणाऱ्या मराठी रसिकांना राष्ट्रवादीच्या गुंडांनी केलेली मारहाण,” असं म्हणत खोपकर यांनी काल ठाण्यात घडलेल्या मारहाण नाट्याचा व्हिडीओही शेअर केला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे मोठे विधान केले होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केला, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. ‘जाणता राजा’ हे महानाट्य त्याचे एक रुप आहे. कारण त्यांचे हे लिखित पुस्तक होते. तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीतील काहीजण पुढे नेत आहेत. अशा गोष्टींना आम्ही विरोध करुच पण संभाजीराजे यांच्या रुपाने एक आवाज मिळाला आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यापाठोपाठ त्यांनी सोमवारी रात्री ‘हर हर महादेव’ चित्रपटाविरोधात आंदोलन केले. आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात शिरून ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला. आव्हाड यांनी केलेल्या आवाहनानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली असून आव्हाड यांनी मध्यस्थी करत त्या प्रेक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns vs ncp over har har mahadev film show in viviana mall is forcefully stopped by jitendra awhad scsg